वृत्तसंस्था/ मोहाली
ऑस्ट्रेलियाचे टेव्हर बेलिस यांची 2023 च्या आयपीएल हंगामासाठी किंग्ज इलेव्हन पंजाब संघाच्या प्रमुख प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. यापूर्वी भारताचा माजी कर्णधार अनिल कुंबळेकडे ही जबाबदारी सोपविण्यात आली होती.
किंग्ज इलेव्हन पंजाब आणि अनिल कुंबळे यांच्यातील यापूर्वी प्रशिक्षकपदासाठी झालेल्या करारामध्ये वाढ न करण्याचा निर्णय या संघाच्या फ्रँचायजींनी घेतला आहे. जागतिक क्रिकेट क्षेत्रामध्ये टेव्हर बेलिस हे एक यशस्वी क्रिकेट प्रशिक्षक म्हणून गणले जातात. आपल्या बहुमोल मार्गदर्शनाखाली बेलिस यांनी इंग्लंडला 2019 साली आयसीसीची विश्वचषक क्रिकेट स्पर्धा जिंकून देण्यामध्ये महत्त्वाची कामगिरी बजावली होती. 2012 साली आणि 2014 साली आयपीएल स्पर्धेचे अजिंक्मयपद मिळविणाऱया कोलकाता नाईट रायडर्स संघाचे बेलिस हे प्रमुख प्रशिक्षक होते. ऑस्ट्रेलियातील बिगबॅश टी-20 लीग स्पर्धेत बेलिस यांनी सिडनी सिक्सर्सला जेतेपद मिळवून दिले होते. 2020 आणि 2021 च्या आयपीएल हंगामात सनरायजर्स हैद्राबाद संघाचे ते प्रमुख प्रशिक्षकही होते. 2022 च्या आयपीएल हंगामात पंजाब संघाला सलग तिसऱयांदा आयपीएल स्पर्धेची प्ले ऑफ फेरी गाठता आली नाही. आता आगामी आयपीएल हंगामात किंग्ज इलेव्हन पंजाबच्या खेळाडूंना बेलिस यांचे बहुमोल मार्गदर्शन मिळणार असून या संघाची कामगिरी दर्जेदार होईल, अशी आशा बाळगली जात आहे. आयपीएलच्या चार हंगामांमध्ये किंग्ज इलेव्हन पंजाब संघाला सहाव्या स्थानावर समाधान मानावे लागले होते. 2022 च्या आयपीएल स्पर्धेत प्राथमिक फेरीमध्ये पंजाब संघाला सलग दोन विजय नोंदविता आले नाहीत. गेल्या वषीच्या या स्पर्धेत पंजाब संघाचे नेतृत्व मयांक अगरवालकडे सोपविण्यात आले होते. पण अगरवाल फलंदाजीत चांगली कामगिरी करू शकला नाही. 2014 च्या आयपीएल स्पर्धेत किंग्ज इलेव्हन पंजाबने अंतिम फेरीत प्रवेश मिळविला होता. पण त्यांना अंतिम सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सकडून हार पत्करावी लागल्याने हा संघ उपविजेता ठरला होता.









