वृत्तसंस्था/ बेंगळूर
येथे सुरू असलेल्या तिसऱया आणि शेवटच्या अनधिकृत कसोटी सामन्यात शुक्रवारी खेळाच्या दुसऱया दिवसाअखेर यजमान भारत ‘अ’ संघाने न्यूझीलंड ‘अ’ संघावर 96 धावांची आघाडी मिळविली. भारत ‘अ’ संघाने दुसऱया डावात 1 बाद 40 धावा जमविल्या.
या अनधिकृत कसोटी मालिकेत पहिले दोन्ही सामने अनिर्णीत राहिले आहेत. आता या तिसऱया आणि निर्णायक सामन्यात भारत ‘अ’ संघाचा पहिला डाव 293 धावांत आटोपल्यानंतर न्यूझीलंड ‘अ’ संघाने शुक्रवारी आपल्या पहिल्या डावाला प्रारंभ केला. भारत ‘अ’ संघाच्या अचूक गोलंदाजीसमोर न्यूझीलंड ‘अ’ संघाचा पहिला डाव 71.2 षटकात 237 धावांत आटोपला न्यूझीलंड ‘अ’ संघातर्फे चॅपमन आणि सोलिया यांनी अर्धशतके झळकवली. चॅपमनचे शतक आठ धावांनी हुकले. न्यूझीलंड ‘अ’ संघाची एकवेळ स्थिती 5 बाद 99 अशी केविलवाणी होती. पण त्यानंतर चॅपमन आणि सोलिया यांनी सहाव्या गडय़ासाठी 114 धावांची भागीदारी केल्याने त्यांना 200 धावांचा टप्पा ओलांडता आला. चॅपमनने 115 चेंडूत 2 षटकार आणि 8 चौकारांसह 92 तर सोलियाने 7 चौकारांसह 54 तसेच क्लेव्हरने 6 चौकारांसह 34 व कर्णधार ब्रुसने 2 चौकारांसह 13 धावा जमविल्या. भारत ‘अ’ संघातर्फे सौरभकुमार आणि राहुल चहर हे सर्वात यशस्वी गोलंदाज ठरले. सौरभकुमारने 48 धावांत 4 तर चहरने 53 धावांत 3, मुकेशकुमारने 48 धावांत 2 व शार्दुल ठाकुरने 33 धावांत 1 गडी बाद केला.

पहिल्या डावात 56 धावांची आघाडी मिळविलेल्या भारत ‘अ’ संघाने दिवसअखेर दुसऱया डावात 11 षटकात 1 बाद 40 धावा जमवित न्यूझीलंड ‘अ’ संघावर 96 धावांची आघाडी मिळविली. सलामीचा ईश्वरन 4 धावांवर बाद झाला. कर्णधार पांचाळ 17 तर ऋतुराज गायकवाड 18 धावांवर खेळत आहे.
संक्षिप्त धावफलक
भारत ‘अ’ प. डाव- 293, न्यूझीलंड ‘अ’ प. डाव- 71.2 षटकात सर्वबाद 237 (चॅपमन 92, सोलिया 54, क्लेव्हर 34, ब्रुस 13, सौरभकुमार 4-48, चहर 3-53, मुकेशकुमार 2-48, ठाकुर 1-33). भारत ‘अ’ दु. डाव- 11 षटकात 1 बाद 40 (पांचाळ खेळत आहे 17, गायकवाड खेळत आहे 18, ईश्वरन 4, सोलिया 1-20).









