गुरुग्राम / वृत्तसंस्था
हरियाणातील शहर गुरुग्राम येथे एका 14 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर एका स्पामध्ये 10 ते 15 जणांकडून अमानुष बलात्कार करण्यात आल्याची घटना घडली आहे. या मुलीने सादर केलेल्या तक्रारींनुसार ही माहिती पोलिसांनी दिली. नुकतेच उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथे दोन दलित मुलींवर बलात्कार झाल्याच्या घटनेनंतर 48 तासात ही सामुहिक बलात्काराची दुसरी घटना आहे.
उत्तर प्रदेशातील दलित मुलींवर बलात्कार करुन त्यांची निर्घृण हत्या करण्याच्या प्रकरणी तेथील पोलिसांनी सोहेल आणि जुनेद या दोन आरोपींना अटक केली आहे. या दोघांनी त्यांच्यावर बलात्कार केला होता. त्यानंतर सोहेल, हफिझुल आणि जुनैद यांनी या मुलींचे गळे दाबून त्यांची हत्या केली. नंतर करिमुद्दीन आणि अरीफ यांनी त्यांचे मृतदेह झाडाला लटकवून त्यांनी आत्महत्या केल्याचा आभास निर्माण करण्याचा प्रयत्न केला. या सर्वांना आता अटक करण्यात आली आहे. गुरुग्राम येधील बलात्कार प्रकरणाचा तपास आता हरियाणा पोलीस करीत आहेत. बलात्कार पिडीतेने काही आरोपींची नावे पोलिसांना सांगितली आहेत. या माहितीच्या आधारे तपास करण्यात येत असून लवकरच सर्व आरोपींना अटक करण्यात येईल, अशी माहिती तपास अधिकाऱयांनी पोलिसांना दिली.









