कुडाळ प्रतिनिधी
सातारा जिल्हा पालकमंत्री म्हणून माझी नेमणूक लवकरात लवकर करावी असे निवेदन भारतीय मराठा महासंघाचे सातारा जिल्हाध्यक्ष विक्रम वाघ यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना सातारा जिल्हाधिकारी यांच्या मार्फत निवेदन केले आहे.
महाराष्ट्रात आघाडी सरकारनंतर शिंदे व भाजपा यांची सत्ता येऊन जवळपास तीन महिने होऊन गेले आहेत तरीसुध्दा अद्यापपर्यंत सातारा जिल्ह्यात पालकमंत्री यांची नेमणूक झाली नाही. मंत्र्यांना दसरा मेळावा, डायलॉगबाजी, योजनेचा पाऊस, काय झाडी काय डोंगर यावर चर्चा करण्यास वेळ आहे. राज्यात फक्त आरोप-प्रत्यारोप गट तटाचे राजकारण चालू आहे. यामुळे जनहिताचा कोणताही विचार करत नसल्याचे दिसून येत आहे. जनता वाऱ्यावर व जिल्हा अनाथ झाला आहे. जनतेची वैयक्तिक लाभाची कामे, पिक विमा अनुदान, आरक्षण, नियोजन समितीची कामे, येणारा निधी, विविध योजना इत्यादी खोळंबल्यामुळे जनता लाभापासून वंचित आहे. सातारा जिल्हयात ओला दुष्काळ जाहीर करण्याची वेळ आलेली आहे. कामगारांचे प्रश्न, रस्त्यांची दुरावस्था, स्थानिकांच्या मानगुटीवर टोलनाक्याची भुत, पावसामुळे पिके गेल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.
पालकमंत्र्या अभावी सातारा जिल्ह्यातील खोळंबलेली विकास कामे पुर्ववत व्हावी म्हणून मी विक्रम अंकुश वाघ भारतीय मराठा महासंघ जिल्हाध्यक्ष माझी तत्काळ पालकमंत्री म्हणून नियुक्ती द्यावी. अधिकृत पालकमंत्री नियुक्त झाल्यास मी पालकमंत्री पदाचा राजीनामा देईन याची मी आपणास ग्वाही देतो. असेही पुढे निवेदनात म्हटले आहे.