राज्यपाल थावरचंद गेहलोत : चन्नम्मा विद्यापीठाचा 10 वा दीक्षांत समारंभ : दीनदयाळ उपाध्याय, पेण्डली वसतिगृह योजनेंतर्गत विद्यापीठाची निवड
प्रतिनिधी /बेळगाव
नवा भारत घडविण्यासाठी पदवीधर तरुण, तरुणींचे योगदान महत्त्वाचे ठरणार आहे. नव संशोधन क्षेत्रात भारताने जगाचे लक्ष वेधून घेतले. नवीन शैक्षणिक धोरणामुळे नवा भारत निर्माण होण्यास मदत होईल. देशात उपलब्ध असणाऱया नैसर्गिक साधनसंपत्तीचा वापर करून देशाला प्रगतीपथापर्यंत नेण्यात युवक महत्त्वपूर्ण ठरतील, असे विचार राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी मांडले.
राणी चन्नम्मा विद्यापीठ (आरसीयू) चा दहावा दीक्षांत समारंभ बुधवारी हलगा येथील सुवर्ण विधानसौध येथे पार पडला. या कार्यक्रमात राज्यपाल बोलत होते. ते म्हणाले, राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करत आरसीयू उत्तम शिक्षण देत आहे. आरसीयू हे राज्यातील सर्वात मोठे विद्यापीठ असून, कमी कालावधीत चांगली शैक्षणिक कामगिरी दाखविल्याबद्दल त्यांनी कौतुक केले. राणी चन्नम्मा यांच्या बलिदानाचे आणि शौर्याचे स्मरण करत ते म्हणाले, राणी चन्नम्मा या तरुणांसाठी प्रेरणादायी ठरत आहेत.
आंध्रप्रदेश येथील सेंट्रल ट्रायबल युनिव्हर्सिटीचे कुलगुरु डॉ. तेजस्वी कट्टीमनी म्हणाले, शाळेतील विज्ञान आणि प्रत्यक्ष विज्ञान यामध्ये मोठी तफावत आहे. यातील दरी कमी करण्यासाठी विद्यार्थ्यांना विज्ञानाचे महत्त्व पटवून देण्याची गरज आहे. आयआयटी, एनआयटी या देशातील सर्वोच्च उच्चशिक्षण संस्था आहेत आणि केंद्रीय विद्यापीठे उत्तम कामगिरी करीत आहेत. केंद्र व राज्य सरकारने विद्यापीठांचा शैक्षणिक दर्जा आणि पायाभूत सुविधा सुधारण्यासाठी विशेष अनुदान दिले पाहिजे. देशाच्या प्रगतीची साधणे म्हणून तंत्रज्ञान आणि संशोधनाचा वापर करून विकास साधला गेला पाहिजे, असे त्यांनी सांगितले.
राणी चन्नम्मा विद्यापीठाचे कुलगुरु प्रा. रामचंद्र गौडा यांनी स्वागत व प्रास्ताविक करून यावषी 48 हजार विद्यार्थ्यांना पदवी, 48 पीएचडी, 3 मानद डॉक्टरेट, 13 पी. जी. डिप्लोमा, 2 हजार 434 मास्टर्स, 80 अभ्यासक्रमांचे प्रमाणपत्र वितरित केले जाणार असल्याचे सांगून विद्यापीठाच्या शैक्षणिक कामगिरीची माहिती दिली. दीनदयाळ उपाध्याय, प्रेण्डली वसतिगृह योजनेंतर्गत विद्यापीठाची निवड झाली असून मुलांची 6 तर मुलींची 4 वसतिगृहे बांधण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमाला खासदार अण्णासाहेब जोल्ले, राज्यसभा सदस्य इराण्णा कडाडी, विद्यापीठाच्या मूल्यमापन विभागाचे रजिस्ट्रार प्रा. शिवानंद गोरनाळे, रजिस्ट्रार एम. हणमंतप्पा, फायनान्स ऑफिसर प्रा. डी. एन. पाटील यांच्यासह इतर उपस्थित होते.
तिघांना मानद डॉक्टरेट
समाजक्षेत्रातील योगदानाबद्दल सामाजिक कार्यकर्ते व्ही. एच. रविचंदर वेंकटरमन, अभिनेता व दिग्दर्शक रमेश अरविंद व बसव विचारांच्या प्रचारक अन्नपूर्णा यांना मान्यवरांच्या हस्ते मानद डॉक्टरेट प्रदान करण्यात आली. एकूण 11 विद्यार्थ्यांना सुवर्णपदकाने गौरविण्यात आले. विद्यावती गुडोदगी, दिपीका चव्हाण, द्राक्षायणी वाल्मिकी, तात्यासाहेब धबडे, गौरी अलपण्णावर, अनुजा पाटील या विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले. रसिका मालाई, संजीवनी पाटील, वर्षा मरडी, प्रेरणा पानाळकर यांना सुवर्णपदकाने सन्मानित करण्यात आले.









