गोव्यात गणेशोत्सवाची अद्याप धामधूम सुरू आहे. दीड दिवशीय, पाच, सात, नऊ, अनंत चतुर्दशी, अकरा दिवशीय सार्वजनिक गणेशोत्सवाची सांगता झाली आहे. फोंडा तालुक्यातील आडपई गावानेही दरवर्षीप्रमाणे पाच दिवशीय गणेश विसर्जनाची अनोखी परंपरा जपली. गोव्यात काही ठिकाणी 21 दिवशीय सार्वजनिक गणेशोत्सवाची परंपरा आहे. याची सांगता मंगळवार दि. 20 सप्टेंबर रोजी होणार आहे.
कोरोनाचा संसर्ग सध्या आटोक्यात असताना सध्या गोमंतकीय उत्साही मूडमध्ये आहेत. दीड, पाच, सात, नऊ, अनंत चतुर्दशी, अकरा दिवशीय गणेशोत्सव झाल्यानंतर अनेकांची पावले माशेल, कुंभारजुवे येथील 21 दिवशीय वैशिष्टय़पूर्ण, कलात्मक गणेशमूर्ती व देखाव्यांचे दर्शन घेण्यासाठी वळायची. गोव्यात येणारे पर्यटकही याठिकाणी आवर्जून भेट देऊन आगळय़ावेगळय़ा गणेशमूर्ती व देखाव्यांचे दर्शन घेऊन तृप्त व्हायचे. 21 दिवसांचा हा गणपती महोत्सव केवळ गोव्यातीलच नव्हे तर शेजारील राज्यातही भाविकांचे आकर्षण बनले होते. परंतु कुंभारजुवे, माशेल भागात यंदाही गणेशचतुर्थी उत्सव अत्यंत साध्या प्रमाणात साजरा करण्याचे ठरविण्यात आल्याने यंदाही भाविकांसाठी भव्य-दिव्य गणपती देखाव्यांचे दर्शन दुर्लभच राहणार आहे. गणेशोत्सवासाठी लागणाऱया माटोळी सामानाचीही लाखोंची उलाढाल यंदा झाली आहे. चतुर्थीच्या निमित्ताने पणजीत भरणाऱया अष्टमीच्या फेरीतही यंदा लाखोंची उलाढाल झाली. मात्र पावसामुळे काही प्रमाणात त्यावर विरजण पडले.
आज गोव्यात बऱयाच गावांमध्ये सार्वजनिक गणेशोत्सव भव्यतेने साजरा होत आहे. लॉटरी, देणगी स्वरुपात मोठय़ा प्रमाणात आर्थिक गंगाजळीही निर्माण होते आहे. हा निधी सत्कारणी लागणे महत्त्वाचे आहे. महाराष्ट्रामध्ये काही गणेशोत्सव मंडळे झालेल्या आर्थिक लाभातून शाळा दत्तक योजना, गरीब घटकांसाठी मदत तसेच विविध समाजोपयोगी उपक्रम राबवित आहेत. पूरग्रस्तांनाही काही गणेश मंडळांनी मदतीचा हात दिला आहे. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून गोव्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनीदेखील पावले उचलणे आवश्यक आहे. केवळ उत्सवापुरतेच सीमित न राहता मंडळाचे उपक्रम वर्षभर चालू राहणे गरजेचे आहे. यातूनच समाज पर्यायाने गोवा राज्य एका वेगळय़ा दिशेने वाटचाल करील, अशी अपेक्षा बाळगण्यास हरकत नाही. आज गोव्यात अनेक समस्या भेडसावत आहेत. अनेक संकटे आ।़।़वासून उभी आहेत. यावर मात करण्यासाठी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी दक्ष राहणे तसेच उपाययोजना आखण्यासाठी सज्ज राहणे आवश्यक आहे.
भारत देश स्वतंत्र करण्याच्या हेतूने सर्व लोक एकत्रित यावेत, या उद्देशाने लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची मुहूर्तमेढ पुणे येथे रोवली. स्वातंत्र्योत्तर काळात आज स्वराज्याचे रुपांतर सुराज्यात करण्याची जबाबदारी गणेशोत्सव मंडळांवर आहे. ही जबाबदारी पेलण्यासाठी मंडळांनी पावले उचलणे कर्तव्य ठरते.
पुण्याच्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे यंदाचे 127 वे वर्ष आहे. या मंडळाचे सुमारे चौदा उपक्रम आहेत. त्यातील बारा कार्यक्रम हे दीन-दुबळय़ांची सेवा करणारे आहेत. तसेच हे उपक्रम केवळ उत्सवापुरतेच मर्यादित नाहीत तर ते कायमस्वरुपी चालणारे आहेत. या मंडळाचा आदर्श इतर गणेश मंडळांनीही गिरवावा, हे येथे नमूद करावेसे वाटते.
गोव्यातील सार्वजनिक गणेशोत्सवाचे स्वरुप आता बदलत चालले असून मंडळाचे कार्य धार्मिकतेकडून सामाजिक, शैक्षणिक, विज्ञानाकडे झुकत आहे. गणेशोत्सव मंडळांच्या या कार्यक्रमातून सुदृढ आणि आदर्श समाज घडणे आवश्यक आहे. गणेशोत्सव मंडळाचे कार्यक्रम आज समाजाभिमुख होत असून सामाजिक रुप निर्माण करीत असताना खऱया अर्थाने लोकोत्सवाचे स्वरुप प्राप्त झाले आहे. सार्वजनिक गणेशोत्सवाची परंपरा अखंडित राहणे आवश्यक आहे. गोमंतकीय संस्कृतीचे खऱया अर्थाने संवर्धन यामुळे होईल. कॅसिनोमुळे गोव्याची संस्कृती पूर्णपणे नष्ट होत चालली असून या संस्कृतीमुळे अमलीपदार्थांचे लोण वाढले आहे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनीही यात गांभिर्याने लक्ष घालून अमलीपदार्थ विरोधी मोहीम आखणे, जागृती करणे आवश्यक आहे. खून, दरोडे, आत्महत्या, अपघात, चोरीचे प्रमाण वाढत आहे. या विरोधात योग्य ती पावले उचलून गोवा राज्य सुजलाम्, सुफलाम् बनविणे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे तसेच गोमंतकीयांचे कर्तव्य ठरते. संपूर्ण जग, देशाबरोबरच गोव्यातही कोरोनाचा संसर्ग असून त्याचा पूर्णपणे नायनाट होणे आवश्यक आहे. विद्यमान स्थितीत समस्त गोमंतकीय गणेशभक्त ‘श्रीं’कडे एकच मागणे मागू शकतो, ‘बा गणराया, आमच्या गोवा राज्यावर येणारी विघ्ने दूर कर महाराजा, गोंयकारांचे आरोग्य चांगले ठेव महाराजा!’
राजेश परब








