Pradhan Mantri Awas Yojana–
केंद्रसरकारची पंतप्रधान आवास योजने संदर्भातील मार्गदर्शनपर बैठक नुकतीच नगराध्यक्ष चेतन चव्हाण व मुख्याधिकारी शिवराज गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली. ही बैठक येथील नगरपंचायतच्या हनुमंत सभागृहात आयोजित करण्यात आली होती.
या बैठकीला उपनगराध्यक्ष देविदास गवस, बांधकाम सभापती नितीन मणेरीकर, महिला व बालकल्याण सभापती ज्योती जाधव, नगरपंचायत अभियंता प्रबोधन मठकर आदी उपस्थित होते. यावेळी उपस्थित नागरिकांना मार्गदर्शन करताना अभियंता मठकर म्हणाले की, आपल्या कसई – दोडामार्ग नगरपंचायतने पंतप्रधान आवास ही योजना शहरातील प्रत्येक गरीब गरजूपर्यंत पोहोचवावी यासाठी ही बैठक आयोजित केली आहे. शहरातील एकही लाभार्थी ह्या योजनेपासून वंचित राहू नये यासाठी सर्व नागरिकांनीही ह्यासाठी प्रयत्न करावेत. या योजनेसंदर्भातील परीपूर्ण प्रस्ताव कसे करावे याबाबतची माहिती श्री. मठकर यांनी यावेळी दिली. तसेच या योजनेचे प्रस्ताव करताना काही अडचणी उद्भवल्यास नगरपंचायतशी संपर्क साधण्याचे आवाहनही यावेळी मठकर यांनी केले आहे.
दोडामार्ग / प्रतिनिधी









