करमल घाटात घडलेला प्रकार, सुदैवाने बाका प्रसंग टळला, कदंबचा गलथानपणा पुन्हा उघड
प्रतिनिधी /काणकोण
मडगाव-कारवार महामार्गावर वाहतूक करणाऱया कदंब महामंडळाच्या एका धावत्या बसचा टायर सुटून पडण्याची घटना मंगळवारी दुपारी करमल घाटात घडली. मात्र दैव बलवत्तर असल्याने यावेळी मोठा अपघात होण्यापासून टळला. या घटनेमुळे कदंबचा गलथान व्यवहार पुन्हा एकदा उजेडात आला असून याबद्दल प्रवासी वर्गाकडून संताप व्यक्त केला जात आहे. या प्रकाराची गंभीर दखल महामंडळाच्या अध्यक्ष असलेले नावेलीचे आमदार उल्हास तुयेकर व अन्य वरिष्ठ अधिकाऱयांनी घेऊन असे प्रकार यापुढे होणार नाहीत याची काळजी घ्यावी, अशी मागणी प्रवाशांनी केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सदर बस काणकोणहून 2.50 वा. सुटल्यानंतर नेहमीप्रमाणे त्याच्या चालकाने नेहमीप्रमाणे ती सुसाट सोडली होती. त्याचवेळी वा करमल घाटाच्या उतरणीवर बस असताना हा प्रकार घडल्यास बाका प्रसंग निर्माण झाला असता. मात्र सुदैवाने करमल घाट चढत असताना आणि बसचा वेग कमी असताना हा टायर सुटला. तसेच त्यावेळी पाठीमागून दुचाकी वा कारही येत नव्हती. अन्यथा सुटलेला टायर आदळून त्यांनाही अपघाताला तोंड द्यावे लागण्याचा धोका होता.
महत्त्वाचे म्हणजे टायर सुटून पडल्यानंतर काही काळ तशीच डगमगणारी बस चालकाने कल्पना न येता पुढे नेली. टायर पंक्चर झाल्यानंतर वा फुटल्यानंतर जशी स्थिती होते तशी बस डगमगू लागल्याने प्रवाशांना संशय येऊ लागला होता. त्यानंतर काही तरी बिनसले असल्याची खात्री झाल्यानंतर बस थांबविली गेली असता पाठीमागचा एक टायर गायब असल्याचे दिसून आले. मग बसचालकाने प्रवाशांसह शोध घेतला असता हा टायर सुटून घरंगळत रस्त्याच्या बाजूच्या खळीत जाऊन पडला असल्याचे प्रवाशांनी निदर्शनास आणून दिले. सहसा टायरच्या बाबतीत गडबड असल्यास चालकाच्या ते लक्षात येत असते. याविषयी प्रवाशांनी चालकाला विचारले असता त्याने आपल्याला आज नेहमीची बस मिळाली नव्हती आणि बसच्या आवाजात आपल्याला ते जाणवले नाही असे उत्तर दिले. मात्र यावर समाधान न झालेल्या प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सदर बसचा पाठीमागचा टायर डगमगत असल्याचे वाटेत एका खासगी बसवाल्याने पाहून त्याने काणकोणातील स्थानकावरील कदंब कार्यालयात संपर्क साधून त्याची कल्पना दिली होती, तर टायरशी संबंधित काही भाग गुळे येथे रस्त्यावर पडल्याचे पाहून कदंबच्या एका इलेक्ट्रिक बसच्या चालकाने कल्पना दिली होती. त्यामुळे कार्यालयातील कर्मचाऱयांनी ताबडतोब बसचालकाशी संपर्क साधण्याची तयारी केली होती. मात्र त्यापूर्वीच प्रकार लक्षात येऊन बस थांबवली गेली.
योग्य तपासणी होते का ?
यामुळे मडगाव-कारवारसारख्या लांब पल्ल्याच्या मार्गावरील बसेस नीट तपासणी केल्याविनाच सोडल्या जातात का, चालकाच्या ताब्यात सुपूर्द केल्या जाणाऱया बसेस पूर्ण सुरक्षित असतील याची खातरजमा कोणी करायची आणि अशा प्रकारे एखादा अपघात घडल्यास त्याची जबाबदारी ती कोणाची, असे सवाल प्रवाशांनी उपस्थित केले आहेत. यासंदर्भात चौकशी करून संबंधितांवर कडक कारवाई करवी. यासाठी एखादी दुर्घटना घडण्याची महामंडळाने वाट पाहू नये, अशी मागणी प्रवाशांनी केली आहे.









