प्रक्रिया किचकट-वेळखाऊमुळे वितरणास उशीर
प्रतिनिधी /बेळगाव
पदवी-पदव्युत्तर विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी परिवहनने बसपास प्रक्रिया सुरू केली आहे. बीए, एम.ए., बी.कॉम., आयटीआय, डिप्लोमा, नर्सिंग आदी विद्यार्थ्यांसाठी बसपास प्रक्रिया सुरू झाली आहे. विद्यार्थ्यांना सेवा सिंधू पोर्टलच्या माध्यमातून ऑनलाईन अर्ज दाखल करावा लागत आहे. ही प्रक्रिया थोडी किचकट व वेळखाऊ असल्याने बसपास वितरणास उशीर होत आहे.
परिवहनने पदवी-पदव्युत्तर विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी जुन्या बसपासची मुदत वाढविली आहे. दरम्यान, विद्यार्थ्यांना नवीन बसपास मिळविणे अनिवार्य आहे. मागील दोन वर्षात बसपासची प्रक्रिया पूर्णपणे बदलली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना प्रथमतः ऑनलाईन अर्ज करावा लागत आहे. त्यानंतर अर्जांची छाननी करून बसपास वितरित केले जात आहेत. बसपास प्रक्रिया पूर्णपणे बदलल्याने अधिक वेळ लागत आहे. पूर्वी शैक्षणिक वर्षारंभी बसपास प्रक्रियेला प्रारंभ होत होता. शिवाय बसपास प्रक्रिया सुरळीत होती. त्यामुळे अर्ज केल्यानंतर तातडीने बसपास वितरित केले जात होते. मात्र, आता ऑनलाईन पद्धतीमुळे बसपास वितरणास विलंब होत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना 15 दिवस नवीन बसपासची प्रतीक्षा करावी लागत आहे. परिवहनने यापूर्वी प्राथमिक, माध्यमिक, कॉलेज आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना बसपास वितरित केले आहेत. ज्यांनी अद्याप बसपास मिळविले नाहीत, त्यांच्यासाठीही बसपास उपलब्ध करून दिले जात आहेत. त्यामुळे बसपास विभागात पुन्हा विद्यार्थ्यांची वर्दळ वाढली आहे.









