प्रतिकूल परिस्थितीतही आशिया चषक जेतेपद मिळवणाऱया लंकन खेळाडूंवर कौतुकाचा वर्षाव
कोलंबो / वृत्तसंस्था
यंदा संयुक्त अरब अमिरातीत संपन्न झालेल्या आशिया चषक टी-20 स्पर्धेचे जेतेपद संपादन करणाऱया श्रीलंकन क्रिकेट संघाचे मायदेशी जंगी स्वागत करण्यात आले. खुल्या बसमधून जेतेपदाच्या चषकासह लंकन क्रिकेट पथकाचा व्हिक्टरी परेड संपन्न झाला. अविस्मरणीय जेतेपद मिळवणाऱया या संघाच्या स्वागतासाठी लंकन चाहते हजारोंच्या संख्येने सहभागी झाले.
भानुका राजपक्षचे शानदार अर्धशतक आणि फिरकीपटू वणिंदू हसरंगा, जलद गोलंदाज प्रमोद मदुशन यांच्या भेदक माऱयाच्या बळावर लंकेने रविवारी पाकिस्तानचा 23 धावांनी फडशा पाडत सहाव्यांदा आशिया चषक जेतेपदावर आपली मोहोर उमटवली.

वास्तविक, अंतिम फेरीत लंकेचा संघ बॅटिंग पॉवर प्लेदरम्यान खराब स्थितीत होता. मात्र, राजपक्ष (नाबाद 71) व हसरंगा (36) यांनी दमदार अर्धशतकी भागीदारी साकारत संघाला निर्धारित 20 षटकात 6 बाद 170 धावांची मजल मारुन दिली. नंतर गोलंदाजीत वणिंदू हसरंगा (3-27), प्रमोद मदुशन (4-34) यांनी एकत्रित 7 बळी गारद करत लंकेच्या अविस्मरणीय जेतेपदावर शिक्कामोर्तब केले. मोहम्मद रिझवान (55) व इफ्तिकार अहमद (32) यांच्या 61 धावांच्या धोकादायक भागीदारीनंतरही पाकिस्तानचा संघ विजयाच्या आसपासही फिरकू शकला नाही.
विजयासाठी 171 धावांचे आव्हान असताना मध्यमगती गोलदांज दिलशान मदुशनकाने वाईड-नोबॉलच्या माध्यमातून तब्बल 9 अवांतर धावा दिल्या. मात्र, नंतर त्याने षटकात केवळ तीन धावा देत कमबॅक केले. त्यानंतर पुढील दोन षटकांच्या खेळात लंकेने स्टार फलंदाज बाबर आझमला अवघ्या 5 धावांवर बाद करत मोठे यश मिळवले. प्रमोद मदुशनने शॉर्ट फाईन लेगवरील मदुशनकाकरवी झेलबाद करत बाबर आझमचा मोठा अडथळा दूर सारला.

मदुशनने नंतर डावखुऱया फखर झमानला गोल्डन डकवर बाद करत आणखी खळबळ उडवून दिली. त्याने दोन चेंडूत दोन बळी घेतल्याने पाकिस्तानची 22 धावात 2 बळी अशी दाणादाण उडाली. त्यानंतर रिझवान व इफ्तिकार यांनी डाव सावरण्याचा काही काळ प्रयत्न केला असला तरी लंकेने लाईन अँड लेंग्थ गोलंदाजीवर उत्तम भर दिल्याने या उभयतांच्या प्रयत्नांवर मर्यादा राहिल्या.
मदुशनच्या दुहेरी धक्क्यानंतर लंकेला पुढील 15 चेंडूत केवळ 15 धावा करता आल्या. यावरुन त्यांच्यावर कसे दडपण गाजवले गेले, याचे प्रत्यंतर आले. सहा षटकांच्या पहिल्या बॅटिंग पॉवर प्लेनंतर पाकिस्तानचा संघ 2 बाद 37 अशा अडचणीच्या स्थितीत होता. 10 षटकाअखेर त्यांनी 3 बाद 68 पर्यंत मजल मारली. इफ्तिकार व रिझवान यांनी 44 चेंडूत अर्धशतकी भागीदारी साकारली. वणिंदू हसरंगाने डावातील 12 व्या षटकात 14 धावा दिल्या. मात्र, 14 व्या षटकात मदुशनने इफ्तिकारला 31 चेंडूत 32 धावांवर बॅकवर्ड स्क्वेअर लेगवरील बंदाराकरवी झेलबाद केले होते.
हसरंगाचे शेवटचे षटक निर्णायक
15 व्या षटकात धनंजया डीसिल्व्हाने केवळ 4 धावा देत दडपण कायम ठेवले. पाकिस्तानला शेवटच्या 5 षटकात 70 धावांची आवश्यकता होती. त्यानंतर नवाझने चमिका करुणारत्नेच्या गोलंदाजीवर दडपण झुगारुन टाकण्याच्या प्रयत्नात आपली विकेट बहाल केली आणि पाकिस्तानसाठी हा मोठा धक्का ठरला. नवाझने केवळ 4 धावांवर बॅकवर्ड डीप स्क्वेअर लेगवरील मदुशनकडे सोपा झेल दिला. पुढे, रिझवानने उत्तुंग षटकाराच्या बळावर स्पर्धेतील तिसरे अर्धशतक साजरे केले. मात्र, हसरंगाचे शेवटचे षटक निर्णायक ठरले. त्याने रिझवान (55), असिफ अली (0) व खुशदिल (2) यांना केवळ 5 चेंडूंच्या अंतरात बाद केले आणि त्या षटकानंतर पाकिस्तानची 7 बाद 112 अशी दाणादाण उडाली.
तिक्षणाने शदाबला गुणतिलकाकरवी 8 धावांवर बाद करत आणखी एक धक्का दिला. अफगाणविरुद्ध विजयातील पाकिस्तानचा हिरो नसीम शाहला मदुशनने बाद केले. मदुशनचा हा चौथा बळी ठरला होता. करुणारत्ने त्याचा लाँगऑनवर सोपा झेल टिपला. करुणारत्नेने हॅरिस रौफचा त्रिफळा उडवल्यानंतर अंतिमतः पाकिस्तानचा डाव सर्वबाद 147 धावांवर आटोपला आणि लंकेच्या आशिया चषक जेतेपदावर थाटात शिक्कामोर्तब झाले होते.
दरम्यान, लंकन चाहत्यांनी संघाचे जोरदार स्वागत केल्यानंतर लंकन क्रिकेट मंडळाने त्याची काही छायाचित्रे आपल्या अधिकृत ट्वीटर हँडलवरुन शेअर केली. डबलडेकर बसमधील खेळाडूंची छबी टिपण्यासाठी चाहत्यांची मोठी गर्दी झाली. खेळाडूंनीही उपस्थित चाहत्यांचे अभिवादन स्वीकारत त्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली.
‘स्पिरिट ऑफ स्पोर्ट्सचा आम्ही आनंद साजरा करत आहोत. एखाद्या रोमांचक सामन्याप्रमाणे अन्य कोणताही घटक लोकांना असे एकत्रित आणू शकत नाही. शनाकाच्या नेतृत्वाखाली लंकन संघ निश्चितच या जेतेपदाबद्दल अभिनंदनास पात्र आहे’, असे फेअरप्ले न्यूजचे संचालक याप्रसंगी म्हणाले.









