रस्ता अडविल्याने धक्काबुक्की : सर्वेक्षणाचे काम लावले उधळून आयआयटीला विरोधाला जोर
प्रतिनिधी /सांगे
कोठार्ली सांगे येथील नियोजित आयआयटी विरोधकांनी काल सोमवारी जमिनीच्या सर्व्हेच्या कामाला आक्षेप घेत पोलिसांना वाटेतच अडवण्याचा प्रयत्न केला असता केपेचे पोलीस उपअधीक्षक नीलेश राणे यांनी रस्ता अडवणाऱया आयआयटी विरोधक आंदोलकांना रस्ता मोकळा करण्याची तीनवेळा वॉर्निंग देऊनही आंदोलनकर्त्यांनी न ऐकल्याने पोलीसबळाचा वापर करून रस्ता मोकळा केला. यावेळी पोलीस आणि विरोधक यांच्यात झालेल्या धक्काबुक्कीत काही विरोधक जमिनीवर पडले. पोलिसांनी विरोधकांना ढकलून बाजूला काढून रस्ता मोकळा केला. त्यामुळे सर्वे दर्शविणारे पॉईंट निश्चित करण्याचे काम होऊ शकले नाही.
गेल्या दोन दिवसांपासून आयआयटी विरोधक आक्रमक झाले आहेत. कोणत्याही परिस्थितीत नियोजित जागेत आयआयटी नकोच असा पवित्रा या लोकांनी घेतला आहे.
शेतकऱयांमध्ये निर्माण केली जाते भीती
आयआयटी होऊ घातलेल्या जागेत बऱयाच दिवसांपासून जमिनीचे सर्व्हेचे काम चालू आहे. लोकांना तसेच संबंधित शेतकऱयांना विश्वासात न घेता जमिनीचे सर्व्हेकाम चालू असून सीमा अधोरेखित करण्यासाठी दगड घातलेले आहेत. आमदार फळदेसाई आयआयटी याच जमिनीत होणार असल्याचे ठामपणे सांगतात. पोलिसांच्या बळाच्या आधारे सर्व्हे चालू आहे. नागरिक आणि शेतकऱयांमध्ये भिती निर्माण केली जात आहे, असा आरोप यावेळी विरोधकांनी केला.
आम्हाला शेती, डोंगर, झरे नष्ट करायचे नाहीत
आमच्या शेतात आयआयटी नको असे सांगताना डोंगर, शेती, निसर्ग यांची हानी करून आम्हाला आयआयटी नियोजित जागेत नको असे एका विरोधक महिलेने पत्रकारांना सांगितले. नियोजित जमिनीत औषधी झरे वाहतात, त्यामुळे कोठार्ली येथील एका वाडय़ाला ’झरीवाडा’ असे नाव आहे. त्यामुळे आम्हाला झरे नष्ट करायचे नाहीत, असे आंदोलनकर्त्यांनी सांगितले. एका महिलेने तर आपण आजही शेती करत असल्याचे सांगितले.
आता कसली चर्चा करायची?
आमदाराकडे चर्चा करून यावर तुम्ही तोडगा काढू इच्छिता काय, असे पत्रकारांनी विरोधक महिलांना विचारले असता, आता कुठली चर्चा? असा सवाल करून शेतीजमिनीत आयआयटी नकोच असे जोरजोरात सांगितले.
विरोधक-पोलिसांत जोरदार संघर्ष
विरोधकांनी पोलिसांना नियोजित आयआयटीस्थळी जाण्यापासून अडविले. पोलीस उपाधीक्षकांनी विरोधकांना तुम्ही सरकारी रस्ता अडवू शकत नाही, असे बजावले. यावेळी पोलीस आणि विरोधक यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली. पोलिसांनी तीनवेळा विरोधकांना शांततापूर्ण रस्ता मोकळा करण्याची ताकीद देऊनही विरोधकांनी ऐकले नाही. ह्याच दरम्यान विरोधकांनी राष्ट्रगीतही म्हटले. राणे यांनी आम्ही तुमच्या खासगी जमिनीत जात नाही. तुम्ही आम्हाला सरकारी काम करण्यापासून अडवू शकत नाही असेही विरोधकांना बजावले. तरीही विरोधक रस्त्यावरुन न हटल्याने पोलिसांनी विरोधकांना ढकलत रस्ता मोकळा केला.
यावेळी मोठया संख्यने महिलां विरोधक उपस्थित होत्या.सांगेचे मामलेदार राजेश साखळकर, सांगेचे पोलीस निरीक्षक विनायक पाटील व अन्य सरकारी अधिकारी हजर होते. मधल्या काळात आयआयटीचा विरोध करण्याचा आवाज थंडावला होता. तसेच जमिनीच्या सर्व्हेचे काम चालू होते. मात्र अचानक विरोध वाढू लागला आहे. त्यामुळे आयआयटी वेगळय़ा मार्गाने जाते की काय असे चित्र दिसून येते.
अतिक्रमण करणारेच विरोध करत आहेत : मंत्री फळदेसाई

सांगे येथील नियोजित आयआयटी उभारण्यासाठीची जमीन सरकारच्या मालकीची आहे. 9 लाख मीटर जमिनीपैकी दीड लाख मीटर जमिनीवर स्थानिक शेतकऱयांनी आणि नागरिकांनी कब्जा केलेला आहे. तेव्हा ज्या लोकांचे दावे योग्य आहेत, त्यांना योग्य तो मोबदला दिला जाईल. या जागेवर काही अतिक्रमणे आहेत. काहीनी शेड बांधून भाडय़ाने इतरांना दिले आहेत. असे अतिक्रमण करणारे लोक विरोध करायला पुढे आहेत, असे आमदार सुभाष फळदेसाई यांनी सांगितले.
या जमिनीत शेती किंवा इतर लागवडीची झाडे नाहीत मात्र काही स्थानिक लोक शेतकऱयांना चुकीची माहिती पुरवून इतरांना भडकावत असल्याचा आरोप फळदेसाई यांनी केला. आपण अगदी सुरुवातीपासून शेतकऱयांना विश्वासात घेतले आहे. त्यांनी सकारात्मक दृष्टीकोन ठेवून विचार केला पाहिजे. आयआयटीही शैक्षणिक संस्था आहे, तो एखादा उद्योग नाही, असेही ते म्हणाले.









