प्रतिनिधी / सातारा
आजकाल मुली सर्वच क्षेत्रात आघाडीवर आहेत, यातच एनसीसीमध्ये अत्त्यंत महत्वाच्या मानल्या जाणाऱया ‘ऑल इंडिया थल सैनिक कॅम्प’ या राष्ट्रीय स्तरावरील कॅम्पसाठी सातारच्या साक्षी विलास साळुंखे हिची निवड करण्यात आली आहे. या कॅम्पमध्ये साक्षी ही संपुर्ण महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व करणार आहे. या कॅम्पमध्ये निवड होण्याकरीता साक्षीने अत्त्यंत खडतर असे परिश्रम घेतले आहेत, नुकतीच तिची निवड झाल्याने तिच्या या परिश्रमांना यश मिळाले आहे.
सातारा जिल्हय़ातुन एकुण साक्षीसह तीन विद्यार्थीनींची निवड झाली असून, महाराष्ट्रातुन 35 विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. हे कॅम्प दि. 11 पासुन सुरू झाले असुन येत्या 25 सप्टेंबर पर्यंत दिल्ली येथे होणार आहे. साक्षी ही सातारा येथील धनंजयराव गाडगीळ वाणिज्य महाविद्यालय व 22 महाराष्ट्र बटालियन एनसीसी साताराची कॅडेट आहे. या शिबिरात निवडीसाठी मागील तीन महिन्यापासून साक्षी साळुंखे कोल्हापूर एनसीसी ग्रुप हेडकॉटर येथे पार पडलेल्या झालेल्या विविध कॅम्प मधून कठोर परिश्रम घेऊन या टप्प्यापर्यंत पोहोचलेली आहे.
एनसीसी थल सैनिक कॅम्पच्या निवडीसाठी विद्यार्थ्यामधील युद्ध कोशल्य, युद्धातील डावपेच, फील्ड क्राफ्ट, बॅटल क्राफ्ट, मॅप रीडिंग, ऑक्स्टीकल ट्रेनिंग फायरिंग इत्यादी कोशल्य तपासले जातात व या कौशल्याच्या आधारावर विद्यार्थ्याची राष्ट्रीय स्तरावरील कॅम्पसाठी निवड होत असते. या कॅम्पच्या माध्यमातून कॅडेट साक्षी विलास साळुंखे दिल्ली येथे महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार आहे. तिच्या यशाबद्दल तिचे सर्व स्तरातुन कौतुक होत आहे.
साक्षीला लहानपणापासुन खेळाची आवड
साक्षी ही मुळची मापरवाडी (ता. वाई) येथील रहिवासी असुन सध्या सदरबाजार सातारा येथे असुन तिचे शालेय शिक्षण निर्मला इंग्रजी माध्यम शाळेत झाले आहे. साक्षीला लहानपणापासुनच खेळ या प्रकारातच अधिक ओढा आहे. त्यामुळेच तिने आजवर विविध स्पर्धांमध्ये सहभाग घेतला आहे. तिने कराटे या खेळ प्रकारात छत्तीसगड येथे झालेल्या स्पर्धेत गोल्ड मेडल व कराटेमध्ये तिला ब्लॅक बेल्ट ही मिळाले आहे. तिची आई सुलोचना या गृहिणी आहेत, तर वडील विलास साळुंखे हे सुजलॉन या कंपनीत कार्यरत आहे. तसेच बहिण श्रेया ही निट परीक्षा देऊन मेडिकलमध्ये प्रवेश मिळविण्याकरीता प्रयत्न करीत आहे.
कुटुंबियांना सार्थ अभिमान
साक्षी हिला लहानपणा पासुनच डिफेन्सबाबतचे आकर्षण होते. त्यामुळे तिचे हे गुण हेरून तिला आम्ही जपान कराटे प्रशिक्षणातही प्रवेश मिळवुन दिला होता. यामध्ये तिचे गोल्ड मेडल व ब्लॅक बेल्ड ही मिळविला आहे. तिने अत्त्यंत खडतर प्ररिश्रम घेऊन हे यश मिळविल्याबद्दल आम्हा कुटुंबियांना ही तिचा सार्थ अभिमान आहे.









