मुख्यमंत्र्याच्या विभागातील आरोग्य विभागाचे वाभाडे, रुग्णवाहिकेत सुविधेचा अभाव
वार्ताहर/ कुडाळ
सातारा जिह्यातील मुख्यमंत्र्यांचे गाव दरे गावाच्या जवळ तापोळा गावात ऍम्बुलन्समध्ये ऑक्सिजन मास्क नसल्याने एका व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे आरोग्य विभागाचे वाभाडे चव्हाटय़ावर आले असून अनेकांनी टीकेची झोड उठवली आहे.
सातारा जिह्यातील मुख्यमंत्र्यांचा कोयना विभागातील तापोळा येथील 108 ऍम्बुलन्समध्ये ऑक्सिजन मास्क उपलब्ध न झाल्याने एका व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. दुर्गम डोंगराळ विभाग म्हणून जो मुख्यमंत्र्यांचे गाव म्हणून ओळखला जाणाऱया कोयना विभागातील तापोळा गावात 108 ऍम्बुलन्समधील असणाऱया सुविधा व्यवस्थित नसल्याने त्याचबरोबर ऍम्बुलन्समध्ये असणाऱया ऑक्सिजन यासह इतर सुविधा योग्य पद्धतीने नसल्याने या विभागातील नागरिकांना अनेक वर्षांपासून योग्य पद्धतीने सुविधा मिळत नसल्याने प्राण गमावण्याची वेळ आली.
त्याचाच प्रत्यय शिवसेनेचे माजी उपजिल्हाप्रमुख स्व. हरिभाऊ सपकाळ यांचे बंधू मारुती रामदेव सपकाळ यांचा ऑक्सिजन वेळेत न मिळाल्याने मृत्यू झाला आहे. या विभागामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हाकेच्या अंतरावर दरे तांब हे गाव आहे.
नुकत्याच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याच गावामध्ये भेट दिली होती व या ठिकाणी विशेष वैद्यकीय कक्ष देखील सुरू करण्यात आले होते. मात्र हे वैद्यकीय कक्ष सुरू करत असताना 108 ऍम्बुलन्सकडे कोणत्याच प्रशासनाचे लक्ष का बरं गेले नाही असा सवाल देखील आता उपस्थित होऊ लागला आहे. या विभागात आरोग्य सुविधा पुरविण्याचे आश्वासन देखील दिले होते. मात्र मुख्यमंत्र्यांच्याच हाकेच्या अंतरावरील असणाऱया तापोळा गावात 108 ऍम्बुलन्सच्या दुरावस्थेने एका व्यक्तीचा जीव गमवावा लागला. याबाबत स्थानिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.
याबाबत वेळापूर गावचे सरपंच राम सपकाळ यासह तापोळा गावचे सरपंच आनंदात धनावडे यांनी संबंधित 108 ऍम्बुलन्सच्या ठेकेदाराला याबाबत जाब विचारला. मात्र त्या ठेकेदाराने उडवाउडवीची उत्तरे दिल्याने 108 ऍम्बुलन्सचा हा भोंगळ कारभार आता मुख्यमंत्र्यांना स्वतः लक्ष घालून सुधारावा लागणार अशी स्थिती सध्या या विभागात झाली आहे.
या विभागासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोटय़ावधीचा निधीची खैरात विशेष बैठक देऊन टाकली होती. मात्र अद्यापही या विभागातील आरोग्य सुविधा न सुधारल्याने 108 ऍम्बुलन्सची आतील सुविधा बिघडलेली असल्याने एका व्यक्तीला जीव गमवावा लागला. याबाबत आता जिल्हा प्रशासन काय भूमिका घेणार जिल्हा आरोग्य विभाग काय भूमिका घेणार याकडे आता लक्ष लागून राहिली आहे.








