महाराष्ट्रातील राजकारणात आतापर्यंत गणेशोत्सव काळात शक्यतो राजकारण बाजूला ठेवले जायचे. मात्र यावेळी गणेशोत्सवातही राजकारण चांगलेच शिगेला पोहचल्याचे मिळाले. आरोप प्रत्यारोपाबरोबरच भाजपचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी तर मुंबईत गणपती दर्शनाला आल्यावर थेट शिवसेनेला गाडण्याची भाषा करताना उद्धव ठाकरेंनी जो धोका दिला त्याची शिक्षा त्यांना मिळाली पाहिजे असे आव्हानच दिले तर हे कमी म्हणून की काय. दादर प्रभादेवी येथे गणेश विसर्जन मिरवणुकीत शिंदे आणि शिवसेना गटात झालेल्या राडय़ात थेट आमदारांनी पिस्तुल काढून हवेत गोळीबार केल्याचा गुन्हा आमदारांवर दाखल झाल्याने शिवसेना आणि शिंदे गटातील संघर्ष भविष्यात पेटणार यात शंका नाही.
मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील राजकीय घडामोडींमध्ये रोज काही ना काही नवीन मुद्दा उपस्थित करत आरोप प्रत्यारोप केले जात आहेत. ज्या विषयाशी जनतेला काही देणंघेणं नाही त्याच विषयांवर राजकीय पक्षांकडून उहापोह केला जात असल्याने लोकांचे राजकीय लोकांकडून चागंलेच मनोरंजन होत आहे. मुंबई महापालिकेत गेली अनेक वर्षे सत्ताधारी असलेल्या शिवसेनेला सत्तेवरुन पायऊतार करण्यासाठी भाजप आणि शिंदे गट आक्रमक झाला असून, शिवसेनेला डिवचण्याची एकही संधी भाजप आणि शिंदे गट सोडत नाहीत. गेल्याच आठवडय़ात मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी याकुब मेमन याच्या कबरीवरुन जोरदार आरोप प्रत्यारोप झाले. निवडणुका जवळ आल्या की अशी जुनी मढी उकरून काढली जातात. शिळ्या कढीला ऊत आणला जातो, पण या नादात राजकारणी काय पेरत आहेत याचा विचार करण्याची गरज आहे. दोन वर्षाच्या निर्बंधानंतर या वर्षी दहीहंडी आणि गणेशोत्सव मोठय़ा जल्लोषात साजरा झाला त्याचे मुख्य कारण म्हणजे आगामी मुंबई महापालिका निवडणूका. या उत्सवातून राजकीय शक्तिप्रदर्शन करण्याची जोरदार स्पर्धा मुंबईत बघायला मिळाली जी या पूर्वी कधी नव्हती. एकीकडे गणेशोत्सवाची धुम सुरू असताना प्रमुख राजकीय पक्ष आणि त्यांच्या नेत्यांनी गणपती दर्शनाच्या निमित्ताने एकमेकांच्या गाठीभेठी करत आपला छुपा अजेंडा सेट करण्याचा प्रयत्न केला तर काहींनी आपले आगामी मिशनच जाहीर करुन टाकले.
मुंबईच्या राजकारण आता तापू लागले आहे. आरोप प्रत्यारोप, बॅनर फाडले, हे रोजचे रूटीन झाले असून परवा विसर्जन मिरवणुकीच्या वेळी शिंदे गट आणि शिवसेना या गटातील संघर्ष टोकाला गेल्याचे बघायला मिळाले. या राडय़ाच्या वेळी दादर येथील शिंदे गटातील आमदार सदा सरवणकर यांनी थेट पिस्तुल काढून गोळीबार केल्याचा आरोप शिवसेनेने केला. यावेळी जरी हा राडा दादरपर्यंत मर्यादित राहिला असला तरी अद्यापही प्रभादेवी या भागातील वातावरण तणावपूर्ण आहे. पण भविष्यात जर असेच सुरू राहिले तर याचे पडसाद हे मुंबईभर उमटण्याची शक्यता नाकारता येत नाही.
सत्तेत असलेल्या भाजप आणि शिंदे गटातील लोकप्रतिनिधींनी थोडा संयम ठेवला पाहिजे. अरे ला कारे करण्याची भाषा करून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. अन्यथा आगामी निवडणुकीत जनता धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. एकीकडे आमदार सदा सरवणकर पिस्तुल काढून गोळीबार करतात, तर काही दिवसापूर्वी शिंदे गटात गेलेले आमदार प्रकाश सुर्वे कोणीही असेल त्याचे हातपाय तोडा मी आहे, जामीन करायला असे आपल्या कार्यकर्त्यांना सांगतात. याचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाला होता, तर याची चर्चा पावसाळी अधिवेशनात गाजली होती. अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी पोलिसांसोबत ज्या पध्दतीने हुज्जत घातली ती बघता आणि भाजप आमदार प्रशांत बंब आणि शिक्षकांमधील वाद बघता सत्तेत असलेल्या राजकीय पक्षाच्या लोकप्रतिनिधींनी आत्मचिंतन करण्याची गरज आहे. अन्यथा अशा वागण्याने जनतेचा रोष हा सरकारच्या विरोधात व्यक्त व्हायला वेळ लागणार नाही.
खासदार, आमदार गेले तरी नगरसेवक शिवसेनेतच
गणेश विसर्जन मिरवणुकीच्या दरम्यान दादर येथे झालेला राडा आणि यावेळी रस्त्यावर उतरलेले शिवसैनिक बघता मुंबईतील शिवसैनिक आज ही आक्रमक असल्याचे यामुळे बघायला मिळाले. शिवसेनेचे जवळपास 40 आमदार आणि खासदार जरी शिंदे गटात सहभागी झाले असले तरी मुंबईतील नगरसेवक मात्र अद्यापही शिवसेनेतच आहेत. नगरसेवक हा विभागातील लोकांच्या थेट संपर्कात असतो. सतत जनमताचा कानोसा तो घेत असतो कारण स्थानिक पातळीवरील काही हजारांच्या मतांच्या गणितात जिंकायला काम महत्त्वाचे असते. नाव आणि चिन्ह नाही. त्यामुळे नगरसेवकांनी अद्यापही शिवसेनेची साथ सोडली नसल्याने शिंदे गटातील आमदारांसाठी ही थोडी चिंताजनक बाब आहे. शिवसेनेचे नेतृत्व जरी शांत असले तरी शिवसैनिक हा आक्रमक असल्याचे पुन्हा एकदा दादर येथे झालेल्या राडय़ावेळी बघायला मिळाले. यापूर्वीही ज्या ज्या वेळी उद्धव ठाकरे आणि शिवसेनेला विरोधकांनी आव्हान दिले त्या त्या वेळी शिवसैनिक रस्त्यावर उतरतो आक्रमक होतो आणि आता तर जे आमदार आहेत ते बंड करुन शिवसेनेच्या विरोधात गेल्याने शिवसैनिकांची या आमदारांविरोधातील भावनेला एक वेगळीच धार असल्याचे दिसत आहे. उद्धव ठाकरे यांनी दादरच्या राडय़ानंतर शिवसैनिक हेच शिवसेनेचे ब्रम्हास्त्र असल्याचे सांगत सदा सरवणकारांविरोधात भिडणाऱया शिवसैनिकांचे कौतुक केले. त्यामुळे भविष्यात शिवसेना आणि शिंदे गट यांच्यातील संघर्ष मात्र वाढणार यात शंका नाही.
शिंदे गट-मनसे युती होणार ?
शिवसेनेकडे असलेल्या मराठी मतांचे धुव्रीकरण करण्यासाठी शिंदे गट आणि मनसे यांची युती होणार असल्याची जोरदार चर्चा आहे. भाजप 227 पैकी किती जागा या दोन्ही गटांना मिळून देणार हे या युतीत बघणे महत्त्वाचे ठरणार आहे. भाजप सध्या नगरसेवक असलेल्यांपैकी अर्ध्या नगरसेवकांना नारळ देणार असल्याची चर्चा आहे. भाजपने केलेल्या सर्वेक्षणात हे नगरसेवक अकार्यक्षम असल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. त्यामुळे पितृपक्षानंतर युतीच्या चर्चांना वेग येण्याची शक्यता आहे.
प्रवीण काळे








