लॉकडाऊनचे शालेय शिक्षणावर अनेक दुष्परिणाम झाले आहेत. त्यापैकी एक, वाचन करण्याची क्षमता कमी झाली आहे आणि दुसरे म्हणजे शालेय विद्यार्थ्याना तोंडी गणिते करता येत नाहीत. मंडईमध्ये एक किलो कांदे, एक किलो बटाटे, अर्धा किलो फ्लॉवर, अर्धा किलो वांगी असे चार जिन्नस घेतले तर त्याचे किती पैसे भाजी विकणाऱयाला द्यावे लागतील याचा हिशेब आठवी-नववीतील विद्यार्थ्यांना तोंडी करता येत नाही. रस्त्यावर भाजी विकणाऱयाला (किंवा भाजी विक्रेत्याच्या मुला-मुलींना) जे गणित तोंडी करता येते, ते गणित शालेय विद्यार्थ्यांना महाविद्यालयात प्रवेश घेण्याची वेळ आली तरीही येत नाही. यावर गंभीरपणे विचार करण्याची गरज आहे कारण गणित हा रोजच्या व्यवहारातील विषय आहेच शिवाय गणितामधील कौशल्य कठीण समस्यांमधून मार्ग काढण्यासाठी उपयोगी पडते.
नववीच्या विद्यार्थ्यांमध्ये व्यावहारिक गणित करण्याची क्षमता सुधारण्यासाठी पुण्यातील काही शाळांमधील विद्यार्थिनींशी संवाद साधला, गणिताविषयी त्यांच्या समस्या जाणून घेतल्या, त्यांना दोन अंकी संख्यांच्या तोंडी बेरजा, वजाबाक्या, गुणाकार, भागाकार, सरळ व्याज काढणे अशी गणिते कशी करावी याच्या युक्त्या सांगितल्या. तेव्हा लक्षात आले की शिक्षण व्यवस्था पुस्तकी गणितामध्ये इतकी गढलेली आहे की त्या गणिताचा पुस्तकाबाहेर काय उपयोग आहे, हेच विद्यार्थ्यांना समजलेले नाही. 37 आणि 25 या संख्यांची तोंडी बेरीज करणे, 73 मधून 19 वजा करणे नववीतल्या विद्यार्थ्यांना कठीण जाते. 45 च्या निम्मे किती, असा प्रश्न विचारल्यानंतर अनेक विद्यार्थ्यांना उत्तर देता आले नाही. याचे उत्तर काढण्यासाठी त्यापूर्वीच्या सम संख्येमध्ये अर्धा मिळवावा, असे केल्यास 22.50 हे उत्तरे तोंडी काढता येते, ही युक्ती सांगितल्यानंतर सर्व अचंबित झाले. याचे कारण शालेय गणित पुस्तकामध्ये दिलेल्या एकाच ठराविक पद्धतीमध्ये अडकले आहे आणि अशा साध्या प्रश्नांची उत्तरे त्यांना पद्धतशीरपणे लिहिल्याशिवाय सांगता येत नाहीत. तथाकथित इंटरनॅशनल स्कूलमध्ये जाणाऱया विद्यार्थ्यांची अवस्था यापेक्षा वेगळी नाही. असेच प्रश्न घराजवळच्या भाजीवाल्याच्या पाचवी-सहावीतल्या मुलीला विचारल्यावर तिने तोंडी उत्तरे क्षणार्धात सांगितली.
याला फक्त शिक्षण व्यवस्था कारणीभूत आहे का? दररोज आपल्या घरी दूध किती लिटर येते, त्याचा दर किती, आपल्या घरामध्ये दुधावर दरमहा किती खर्च होतो, याविषयी आठवी-नववीमधील बऱयाच मुला-मुलींना माहिती नसते. तुमच्या घरी दरमहा किती किलो तांदूळ-गहू-साखर-मीठ विकत घेता? असा प्रश्न मी नववीच्या वर्गातील मुलांना विचारला. त्यावर अनेक मुलांना उत्तर देता आले नाही. काही मुलांनी मीठसुद्धा पाच किलो आणले जाते असे सांगितले. कोणत्या भाज्यांचा दर किलोला किती आहे, याची कल्पना शालेय विद्यार्थ्यांना नाही कारण पालक आपल्या मुलांना या खरेदीसाठी दुकानात भाजी मंडईमध्ये पाठवत नाहीत. शहरामध्ये ज्या घरामध्ये किराणा माल घरपोच येतो आणि त्याचे बिल ऑनलाईन दिले जाते. घरापासून पाच-दहा मिनिटांच्या अंतरावर भाजी मिळत असली तरीही ऑनलाईन मागवली जाते आणि घरातील मुले अशा व्यवहारापासून वंचित राहतात. यावर उपाय एकच. घरामधील अर्थव्यवहारामध्ये मुला-मुलींना सहभागी करून घेणे. कोणत्याही भाज्यांची नावे आणि त्यांचे दर न सांगता त्यांना 4 फळभाज्या आणि 4 पालेभाज्या आणण्याची कामगिरी महिन्यातून किमान दोन वेळा (कोणत्याही पूर्वसूचना न देता) पूर्ण विश्वासाने द्यावी. घरामध्ये दरमहा किराणा सामान आणले जाते, त्याची यादी तयार करणे, त्याचे प्रमाण ठरवणे ही कामे मुलांवर सोपवायला हवीत, त्यांना चुका करण्याची संधी द्यावी. अशी कामे केल्यामुळे मुलांची निर्णयक्षमता वाढते, हिशेब करण्याची कारणमीमांसा लक्षात येते, गणिताचा वापर पुस्तकाबाहेर कसा करावा, कमीतकमी वेळेत उत्तर कसे आणि का द्यावे याचे प्रत्यंतर मुलांना समजत्या वयात येते.
‘1,000 रुपये बँकेत एका वर्षासाठी 6 टक्के व्याजदराने दोन वर्षांसाठी ठेवले तर सरळ व्याजाने दोन वर्षांनी बँकेकडून किती रुपये परत मिळतील?’ याचे उत्तर अनेक विद्यार्थ्यांना देता येत नाही. खरे तर टक्केवारी काढणे हे शालेय शिक्षणात सातवीच्या अभ्यासक्रमामध्ये आहे. आज जे विद्यार्थी नववीमध्ये शिक्षण घेत आहेत त्यांना टक्केवारी काढणे लॉकडाऊनच्या काळात ऑनलाईन शिकवले आहे, असे सरकारी रेकॉर्ड सांगते परंतु ते किती विद्यार्थ्यांना समजले आहे? या प्रश्नाचे उत्तर ‘वीस टक्के विद्यार्थ्यांनासुद्धा टक्केवारी काढता येत नाही’ असे आहे. याची कारणे दोन. प्रथमतः असे दोन तीन वाक्ये वाचून गणित सोडवण्यासाठी दोन्ही वाक्ये वाचता येणे गरजेचे आहे. वाचलेले समजल्यास टक्के कसे काढावे याचे ज्ञान असावे. सरकारी शाळांमधील नववीच्या विद्यार्थ्यांकडे दोन्ही क्षमता कमी झाल्या आहेत. सेमी-इंग्लिश माध्यमामध्ये गणित इंग्रजीमध्ये शिकावे लागते त्यामुळे परिस्थिती ‘आगीतून फोफाटय़ामध्ये’ अशी आहे. गणिताच्या प्रश्नामधील दोन इंग्रजी वाक्यांचा अर्थ लावणे, त्यानुसार गणित सोडवणे नववीच्या अनेक विद्यार्थ्यांना कठीण जाते. इंग्रजीमध्ये गणित शिकणाऱया विद्यार्थ्यांचा गोंधळ आकडे आणि पाढे म्हणताना होत असतो. इंग्रजीमध्ये शिकलेल्या पाढय़ाचा भाजी मंडईमध्ये कसा वापर करायचा हे अनेक विद्यार्थ्यांना समजत नाही. मराठी भाषेमध्ये विचार करणारी मुले इंग्रजीमध्ये हिशेब कसा करू शकतील, हा प्रश्न अद्याप आपल्या शिक्षण व्यवस्थेला पडलेला नाही. अंकगणिताचा व्यवहारात कसा उपयोग करायचा हे माहित नसताना नववीच्या विद्यार्थ्यांच्या आयुष्यात बीजगणिताचा प्रवेश झाला आहे आणि एक्स-वायमध्ये गणिताचा गुंता आणखीनच वाढला आहे. एक्स-वाय, ए स्क्वेअर अधिक बी स्क्वेअर गणिते का शिकायची, याबद्दल शाळेमध्ये उत्तर मिळत नाही.
अंकगणिताचा उपयोग तर्कशास्त्र पक्के करण्यासाठी होतोच शिवाय एकच प्रश्न अनेक मार्गांनी सोडवण्याची सवय आयुष्यात उपयोगी असते. परंतु शाळेमध्ये एकच पद्धत शिकवली जाते आणि त्याच पद्धतीने गणित सोडवले नसल्यास मार्क मिळत नाहीत. अशा परिस्थितीत गणित दोन पद्धतीने सोडवणाऱया टिळकांचे उदाहरण, त्यांच्या पुण्यतिथीला पाठ करून उपयोग काय होणार? आज अनेक विद्यार्थी 450 चे दहा टक्के वही-पेन शिवाय सांगू शकत नाहीत, कारण त्याना एक गणित सोडवण्याच्या अनेक पद्धती शिकवलेल्या नाहीत. 500 वजा 324 हे गणित भाजी विक्रेता वही-पेन शिवाय कसे करू शकतो हे अनेक शालेय विद्यार्थ्यांना माहित नाही.
बुद्धिमत्तेचे नऊ प्रमुख प्रकार मानले जातात त्यामध्ये गणितं सोडवणं आणि कुठच्याही विषयाचा तार्किक दृष्टिकोनातून विचार करण्याचा अंतर्भाव होतो. अमूर्त संकल्पना हाताळणं, एखाद्या घटनेचा-विषयाचा अनेक अंगांनी विचार करणं, कार्यकारणभाव ओळखणं, संकल्पना-घटना यांमधले परस्परसंबंध शोधणं या गोष्टीही या प्रकारच्या बुद्धिमत्तेच्या कक्षेत येतात. त्यामुळे शिक्षक आणि विशेषतः पालकांनी तोंडी गणित शिकवण्यावर भर देणे गरजेचे आहे. शाळेत शिक्षण मिळते परंतु शाळेत मिळते तेवढेच शिक्षण आहे, असा पालकांचा गैरसमज झालेला दिसतो. व्यावहारिक जगाशी तोंडओळख करून देणे, रोजच्या व्यवहारात घरातल्या लहान मुलाना सहभागी करून घेणे, सातवी-आठवीपासून मुलांना खरेदी करण्याच्या जबाबदाऱया देणे, किंमतीचा तुलनात्मक विचार करून खरेदीचा निर्णय घेण्यास प्रवृत्त करणे, हे पालक करू शकतात. आपल्या घरात आई-वडील दरमहा किती कमावतात, यंदाचे दिवाळीचे खर्चाचे बजेट काय आहे, गणेशोत्सवावर आपण किती खर्च करू शकतो, याची कल्पना घरातील सामूहिक चर्चेद्वारे मुलांना समजावी.
बदलत्या काळाप्रमाणे तंत्रज्ञान बदलले म्हणून शालेय विद्यार्थ्यांच्या हातात कॅलक्युलेटर दिल्याने प्रश्न कसे सुटणार? ज्या घरामध्ये डिजिटल घडय़ाळच वापरले जाते, त्या घरातील मुलांना अडीच तासानंतर किती वाजतील हे नेमके सांगणे कठीण जाणार आहे, कारण घडय़ाळाचे काटे फिरताना त्यांनी बघितलेलेच नसते. दोन ड्रेस खरेदी केल्यास तिसरा ड्रेस फ्री म्हणजे नेमके काय आहे, ‘दहा टक्के सूट’ आणि ‘वीस टक्क्यापर्यंत सूट’ यात नेमका फरक काय आहे, हे विद्यार्थ्यांना समजण्याचा कोणताही मार्ग शाळेत उपलब्ध नसल्यामुळे पालकांनी ती जबाबदारी घेणे श्रेयस्कर आहे. पालक मुलांबरोबर वेळ कसा घालवतात आणि त्यांना घरातल्या आर्थिक व्यवहारात कसे सामावून घेतात, वाढत्या वयाबरोबर कुटुंबातील काही निर्णय घेण्याची जबाबदारी मुलांवर कशा पद्धतीने देतात यावरच पुढच्या पिढीचा सर्वांगीण विकास अवलंबून आहे.
-सुहास किर्लोस्कर








