दहशतवाद्याच्या कुटुंबाची याचिका न्यायालयाने फेटाळली
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
जम्मू-काश्मीरच्या हैदरपोरामध्ये सुरक्षा दलांसोबतच्या चकमकीत मारले गेलेला दहशतवादी आमीर माग्रे याचा मृतदेह कब्रमधून बाहेर काढण्याची मागणी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे. आमीरचे वडिल लतीफ यांनी विधिवत अंत्यसंस्कारासाठी मुलाचा मृतदेह बाहेर काढण्याची मंजुरी देण्यात यावी अशी मागणी याचिका दाखल करत केली होती.
न्यायाधीश सूर्यकांत आणि बी.एस. पारदीवाला यांच्या खंडपीठाने याप्रकरणी सोमवारी सुनावणी केली आहे. आमीरच्या मृतदेहावर प्रशासनाने योग्य पद्धतीने अंत्यसंस्कार केले नसल्याचा दर्शविणारा कुठलाच पुरावा नसल्याचे खंडपीठाने म्हटले आहे.
भावना, नव्हे कायदा महत्त्वाचा
आमीरच्या वडिलाच्या भावनांचा आम्ही आदर करतो, परंतु न्यायालय कायद्यांनुसार काम करत असल्याचे म्हणत खंडपीठाने लतीफ यांना आमिरच्या कब्रवर प्रार्थना करण्याची अनुमती दिली आहे.
मागील वर्षी झाला होता ठार
हैदरपोरामध्ये 15 नोव्हेंबर 2021 रोजी सुरक्षा दलांसोबतच्या चकमकीत आमीर आणि त्याचे 3 सहकारी मारले गेले होते. चारही दहशतवाद्यांवर श्रीनगरपासून 70 किलोमीटर अंतरावरील हंदवाडामध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले होते. तर चकमकीनंतर आमीरच्या कुटुंबाने उच्च न्यायालयात धाव घेतली होती.
एकल खंडपीठाचा निर्णय पालटविला
जम्मू-काश्मीर उच्च न्यायालयाच्या एक सदस्यीय खंडपीठाने मे 2022 मध्ये आमीरचा मृतदेह बाहेर काढण्याची अनुमती दिली, परंतु प्रशासनाने त्वरित दोन सदस्यीय खंडपीठासमोर धाव घेतली होती. या नव्या खंडपीठाने जुना निर्णय रद्द करत मृतदेह बाहेर काढता येणार नसल्याचे म्हटले होते.









