प्रतिनिधी /खानापूर
तालुक्यातील लोकोळी ता. खानापूर येथील उच्च प्राथमिक मराठी शाळा इमारतीच्या दोन वर्गखोल्या कोसळल्या. शनिवारी रात्री घटना घडल्याने मोठा अनर्थ टळला. लोकोळी येथील मराठी शाळेत पहिली ते सातवीपर्यंत शाळा आहे. या शाळेत 95 विद्यार्थी शिक्षण घेतात. एकूण पाच वर्गखोल्या होत्या. त्यापैकी दोन वर्गखोल्या कोसळल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे. यासाठी शासनाने तात्काळ शाळेच्या पुनर्बांधणीसाठी निधी मंजूर करावा, अशी मागणी एसडीएमसी अध्यक्ष कृष्णा सुतार यांनी केली आहे.
या खोल्या जीर्ण झाल्या होत्या. त्यामुळे कमिटीने या जीर्ण झालेल्या वर्गखोल्यांमध्ये विद्यार्थ्यांना बसविण्याचे बंद केले होते. त्याला लागून असलेल्या तीन वर्ग खोल्यात सातवीपर्यंतचे वर्ग बसविले जातात. त्यामुळे शिक्षकांना शिकविण्याची अडचण होत आहे. तीन वर्गांत 95 विद्यार्थी दाटीवाटीने बसवून शिकविले जाते. त्यामुळे विद्यार्थ्यांचेही शैक्षणिक नुकसान होत आहे. शाळेसाठी नवीन खोल्या मंजूर कराव्यात, याची मागणी यापूर्वीही करण्यात आली आहे. मात्र संबंधित खात्याने दखल घेतलेली नाही. सद्या होत असलेल्या जोरदार पावसामुळे जीर्ण झालेल्या वर्गखोल्या कोसळल्या आहेत. शाळेचे मुख्याध्यापक पी. व्ही. पाटील आणि एसडीएमसी कमिटी यांनी कोसळलेल्या इमारतीची प्रत्यक्ष पाहणी करून शाळा इमारत कोसळल्यानंतर याबाबत माहिती शिक्षण खाते व तहसीलदार कार्यालयाला देण्यात आली आहे. नवीन शाळा खोल्या तातडीने मंजूर कराव्यात, अशी मागणी लोकोळी येथील पालक वर्गातून होत आहे.









