प्रतिनिधी/ पणजी
गेल्या चोवीस तासांत राज्याला पावासाने झोडपून काढले. अनेक ठिकाणी राज्यभर पावसाची संततधार राहिली. आजही गोव्यात मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला असून येत्या दि. 13 सप्टेंबरपर्यंत गोव्यात मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.
गोव्यात मान्सून सक्रिय झालेला आहे. बंगालच्या किनारी भागात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने बंगाल, ओडिशा, बिहार आदी राज्यांमध्ये आज, उद्या मुसळधार पावसाचा इशारा दिलेला आहे. त्याचबरोबर गोव्यात व पश्चिम किनारी भागात रविवार व सोमवारी मुसळधार पावासाचा इशारा देखील जारी केला आहे. हवामान खात्याने याकरिता लेमन अलर्ट दिला जारी केली आहे. याअगोदर मुसळधार पावसाचा इशारा दिल्यानंतर शुक्रवारी राज्याला पावसाने झोडपून काढले. सांगेमध्ये 3 इंच पावासाची नोंद झाली. सांखळीत शुक्रवारी संध्याकाळी सुरू झालेल्या पावसाचा जोर वाढत गेला व पहाटे 6 वाजपर्यंत पावसाची संततधार चालूच होती.
गेल्या 24तासांत म्हापशात पावणे दोन इंच. पेडणे -1.5 इंच, पणजी 2.5 इंच, फोंडा -2.5 इंच, जुने गोवे -2 इंच, सांखळी-2.5 इंच, काणकोण अर्धा इंच, दाबोळी 1.5 इंच, मडगाव-अर्धा इंच, केपे पाऊण इंच, सांगे 1.5 इंच एवढी नेंद उपलब्ध झाली.
दरम्यान, पावासाचा जोर 13 सप्टेंबरपर्यंत तसाच राहील. पूर्वेकडील भागातील कमी दाबाच्या पट्टय़ाचा परिणाम म्हणून गोव्यातील किनारी भागात जोरदार वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे. ताशी 45 ते 60 किमी या प्रमाणे वारे वाहण्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. डोंगराळ भागात पावसाचा जोर सध्या वाढला असून राज्यातील अनेक नदीपात्रांतील रंगही सध्या बदललेला आहे. राज्यातील बहुतांश नद्यांचे पाणी माती मिश्रित बनले आहे.









