वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार विरुद्ध निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर असा सामना पुन्हा एकदा रंगू लागला आहे. ‘2005 पासून काय घडले आहे त्याची ‘एबीसी’ तरी त्यांना माहीत आहे का’, अशी टिप्पणी नितीश कुमार यांनी त्यांच्या दिल्ली भेटीदरम्यान केल्यानंतर प्रशांत किशोर यांनी त्यावर प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की, ‘12 महिने जाऊ द्या, मग आम्ही विचारू की कोणाला ‘एबीसी’ माहीत आहे आणि कोणाला ‘एक्सवायझेड’ माहीत आहे’.
त्यापूर्वी प्रशांत किशोर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबतच्या नितीश कुमार यांच्या छायाचित्रांसह ट्विट केले आणि एका तासापेक्षा कमी वेळेत ते हटविले. त्यांच्या सदर ट्विटकडे जनता दल (युनायटेड) नेत्यांच्या टिप्पण्यांना प्रतिसाद म्हणून पाहिले जाते. प्रशांत किशोर हे आमच्या पक्षाच्या कारभारावर बोलत आहेत, कारण कदाचित त्यांना भाजपला मदत करायची असेल, अशी टीका सदर नेत्यांनी केली होती.









