कोल्हापूर : प्रतिनिधी
कोल्हापूर जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ . योगेश साळे यांनी कोरोना काळात भ्रष्टाचार केल्याचा आरोप लाल बावटा कामगार संघटनेने केला होता. संघटनेचा हा आरोप म्हणजे ‘गरज सरो अन् वैद्य मरो’ अशी स्थिती आहे. कोरोना काळात माझ्यासह सर्व डॉक्टर्स आणि आरोग्य कर्मचाऱ्यांनी जीव धोक्यात घालून काम केले आहे. आरोग्य विभागाचा सर्व कारभार पारदर्शी असताना देखील भ्रष्टाचाराचे खोटे आरोप करणे चुकीचे आहे असा खुलासा जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे यांनी केला आहे.
प्राथमिक आरोग्य केंद्राकडील कंत्राटी सफाई कामगार यांचे मागील १४ महिन्यांपासून वेतन थकीत असून ते वेतन त्वरीत अदा करावे असा इशारा कोल्हापूर जनरल कामगार युनियनचे अध्यक्ष चंद्रकांत यादव यांनी निदर्शनाद्वारे दिला होता. याच निवेदनाच्या माध्यमातून त्यांनी कोरोना काळात जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे यांनी भ्रष्टाचार केल्याचा आरोप देखील केला होता. हा भ्रष्टाचाराचा आरोप डॉ. साळे यांनी खोडून काढला. केवळ शासनाकडून निधी मिळाला नसल्यामुळे कंत्राटी सफाई कामगारांचे वेतन प्रलंबित आहे. त्यामध्ये भ्रष्टाचार करण्याचा मुद्दाच उपस्थित होत नसल्याचेही डॉ. साळे यांनी स्पष्ट केले.