नियम मोडल्यास होणार दंड ः रस्ते अपघात सुरक्षेबाबत नितीन गडकरींची माहिती
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
आता कारच्या मागच्या सीटवर बसलेल्या प्रवाशालाही सीट बेल्ट लावावा लागणार आहे. असे न केल्यास दंड भरावा लागेल. केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी एका मुलाखतीदरम्यान ही घोषणा केली. गाडीच्या समोर बसलेला प्रवासी सीटबेल्ट न लावल्यावर ज्याप्रमाणे अलार्म वाजतो, तशीच यंत्रणा आता मागच्या सीटवर बसलेल्या प्रवाशालाही केली जाणार असल्याचे गडकरी म्हणाले. त्यासाठी कार कंपन्यांना सूचना देण्यात येणार आहेत.
चारचाकी वाहनाच्या मागील आसनावर बसलेल्या प्रवाशांनाही सीटबेल्ट लावणे आधीच बंधनकारक आहे, पण लोक त्याचे पालन करत नसून आता दंड आकारण्यात येणार असल्याचे गडकरी म्हणाले. दंड घेणे हा हेतू नसून रस्ते सुरक्षितता व्यवस्था अधिक दर्जेदार करणे असे असल्याचे त्यांनी सांगितले. याबाबत जनजागृती करणे आवश्यक असून 2024 पर्यंत रस्ते अपघात 50 टक्क्मयांनी कमी करण्याचे लक्ष्य निर्धारित करण्यात आले आहे.

टाटा सन्सचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांचे रविवारी एका रस्ते अपघातात निधन झाले. मर्सिडीजच्या मागच्या सीटवर बसून प्रवास करताना त्यांनी सीटबेल्ट घातला नव्हता असे सांगितले जात आहे. गडकरींच्या या नव्या घोषणेचा मिस्त्री यांच्या मृत्यूशी संबंध जोडला जात आहे.
एअर बॅगबद्दलही महत्त्वाचे निर्देश
कारच्या मागच्या सीटवर एअरबॅग्ज बसवल्याने कारच्या किमती वाढतील का, या प्रश्नावर गडकरी यांनी लोकांचे प्राण वाचवणे अधिक महत्त्वाचे असल्याचे नमूद केले. एअरबॅगची किंमत 1000 रुपये आहे. अशा स्थितीत सहा आसनांसाठी सहा हजार रुपये मोजावे लागतील. उत्पादन आणि मागणी वाढल्याने त्याची किंमत हळूहळू आणखी खाली येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. नियमानुसार भारतात समोरील प्रवासी आणि चालकासाठी एअरबॅग्ज अनिवार्य आहेत. जानेवारी 2022 पर्यंत, सरकारने कंपन्यांना प्रत्येक प्रवासी कारमध्ये प्रत्येकी 8 प्रवासी असलेल्या 6 एअरबॅग असणे बंधनकारक केले आहे.









