तीन महिन्यातील आकडेवारीचा समावेश
नवी दिल्ली
रेल्वेने मागील तीन महिन्यांत आपल्या मालमत्तेच्या ई-लिलावाद्वारे सुमारे 844 कोटी रुपये कमावले आहेत. पार्किंग, रेल्वेच्या जागेत जाहिराती देऊन, पार्सलचे भाडे, स्वच्छतागृहांचे कंत्राट देऊन सदरची रक्कम उभारली आहे.
रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी गेल्या जूनमध्ये ई-लिलावाद्वारे या व्यावसायिक उपक्रमांना सुरुवात केली होती. यामुळे केवळ करार वाटपाची प्रक्रिया वेगवान होणार नाही तर छोटय़ा उद्योजकांना काम मिळणेही सोपे होणार असल्याचेही त्यांनी यावेळी म्हटले आहे.
रेल्वेने सांगितले की, ई-लिलाव पोर्टल सुरू केल्याने त्याचे उत्पन्न वाढले आहे आणि रेल्वेच्या मालमत्तेचे खरे मूल्य मिळण्यास मदत झाली आहे. रेल्वेने सांगितले की, व्यावसायिक मालमत्तेसाठी ई-लिलाव पोर्टल सुरू केल्यानंतर, आतापर्यंत 8,500 मालमत्तेसाठी सुमारे 1,200 कंत्राटे देण्यात आली आहेत.
बहुतांश करार हे रेल्वे स्थानक परिसर आणि रेल्वे डब्यांमधील जाहिरात अधिकारांशी संबंधित आहेत. या अंतर्गत वाटप केलेल्या 374 करारांमधून रेल्वेला 155 कोटी रुपये मिळतील. त्याचप्रमाणे पार्किंगच्या 374 कंत्राटांमधून 226 कोटी रुपये, पार्सल जमीन भाडेतत्त्वावरील 235 कंत्राटांमधून 385 कोटी रुपये आणि पे टॉयलेटसाठी वाटप केलेल्या 215 कंत्राटांमधून 78 कोटी रुपये मिळणार आहेत.









