रात्री उशिरापर्यंत गणेशभक्तांमध्ये उत्साह : ग्रामीण भागातूनही भाविक दाखल : रात्री बस-हॉटेल्स सुरू ठेवण्याची मागणी
प्रतिनिधी /बेळगाव
बेळगावमधील अनेक मंडळांनी भव्यदिव्य असे देखावे साकारले असल्यामुळे ते पाहण्यासाठी भाविकांची मोठय़ा प्रमाणात गर्दी होत आहे. रात्री उशिरापर्यंत देखावे पाहण्यासाठी भाविकांचा उत्साह दिसून येत आहे. केवळ शहरातच नाही तर उपनगरांमध्येही गणेशमूर्ती पाहण्यासाठी नागरिकांची तोबा गर्दी होत आहे. शहरासोबतच ग्रामीण भागातील गणेशभक्त देखावे पाहण्यासाठी शहरात दाखल होत असल्याचे मागील दोन दिवसांपासून दिसत आहे.
बाप्पाच्या विसर्जनासाठी अवघे दोन दिवस शिल्लक राहिले असल्याने देखावे पाहण्यासाठी गर्दी होत आहे. रविवारपासून रस्ते गर्दीने फुलले असून, रात्री उशिरापर्यंत रस्त्यांवर भाविकांची ये-जा दिसून येत आहे. शहरातील काही लक्षवेधी देखावे भाविकांची गर्दी खेचून घेत आहेत. एसपीएम रोड येथे हलता देखावा सादर करण्यात आल्याने त्या परिसरात भाविकांची मोठी गर्दी होत आहे.
नाझर कॅम्प मंडळाकडून नाष्टा
दुचाकी-चार चाकी तसेच चालत गणेश दर्शन केले जात आहे. ग्रामीण भागातील नागरिक वाहनांनी शहरात येऊन त्यानंतर शहरातील गणपती पाहत आहेत. यामुळे उशिरापर्यंत हॉटेल, चटपटीत खाद्य पदार्थांचे स्टॉल सुरू ठेवण्यात येत आहेत. देखावे पाहण्यासाठी भाविक सायंकाळपासूनच घराबाहेर पडत असल्याने त्यांना नाष्टय़ाची सोय केली जात आहे. नाझर कॅम्प, वडगाव येथे गणेशोत्सव मंडळाने सोमवारी येणाऱया सर्व भाविकांना पुलावाचे वाटप केले.
टिळकवाडी-अनगोळमधील रस्ते गर्दीने फुलले
केवळ शहरातच नाही तर उपनगरांमध्येही यावषी सुंदर देखावे व भव्यदिव्य गणेशमूर्ती साकारण्यात आल्या आहेत. अनगोळ परिसरात अनेक मंडळांनी एकाहून एक सरस डेकोरेशन केल्यामुळे रांगा लावून भाविक मंगळवारी उशिरापर्यंत दर्शन घेत होते. या परिसरात भव्यदिव्य व नावीन्यपूर्ण गणेशमूर्ती साकारण्यात आल्याने सायंकाळनंतर अनगोळमध्ये रस्ते गर्दीने फुलत आहेत. शुक्रवारपेठ, टिळकवाडी येथील मंडळाने भव्य मंदिराचा देखावा साकारला असून, तो पाहण्यासाठी गर्दी होत आहे.
देखावे साकारण्यात आल्याने गर्दी…
गणेश विसर्जनासाठी अवघे तीन दिवस असल्याने मोठय़ा प्रमाणात भाविकांची गर्दी होत आहे. यामुळे मध्यरात्रीपर्यंत देखावे पाहिले जात आहेत. परंतु रात्री दहानंतर बस बंद असल्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. मागील दोन वर्षात कोरोनामुळे मंडळांनी देखावे साकारले नव्हते. यावषी देखावे साकारण्यात आल्याने गर्दी होत असून, रात्री उशिरापर्यंत शहरातील बस सुरू ठेवण्याची मागणी होत आहे. त्याचबरोबर हॉटेलही सुरू ठेवावीत, अशी मागणी होत आहे.









