विदेशी लीग खेळण्यासाठी आयपीएल, प्रथमश्रेणीमधून बाहेर
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
माजी भारतीय फलंदाज सुरेश रैनाने सर्व क्रिकेट प्रकारातून निवृत्ती जाहीर केली असून यापुढे तो फक्त विदेशातील टी-20 लीग क्रिकेट खेळणार आहे. 35 वर्षीय रैनाने यापूर्वी दि. 15 ऑगस्ट 2020 रोजी धोनीपाठोपाठ आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. यापुढे तो भारतातील आयपीएल व अन्य प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये खेळणार नाही.
शैलीदार डावखुरी फलंदाजी करणाऱया रैनाचा 2021 आयपीएलमध्ये सहभाग होता. पण, चेन्नई सुपरकिंग्सने यंदाच्या हंगामापूर्वी त्याला करारातून मुक्त केले. सध्याच्या नियमानुसार, भारतीय संघातून किंवा भारतीय प्रथमश्रेणी संघातून खेळत असलेल्या कोणत्याही खेळाडूला विदेशी लीगमध्ये सहभागी होता येत नाही. त्यामुळे, जागतिक स्तरावरील लीगमध्ये खेळण्यासाठी त्याने आयपीएल व प्रथमश्रेणी क्रिकेटमधूनही निवृत्त होणे आवश्यक होते.
रैना आता पुढील वर्षी होणाऱया क्रिकेट दक्षिण आफ्रिकाच्या नव्या लीगमध्ये सहभागी होऊ शकेल. सदर लीगमधील सर्व 6 संघ आयपीएल प्रँचायझींचे असून यात चेन्नई सुपरकिंग्सचा देखील समावेश आहे. रैनाने यापूर्वी ऑक्टोबर 2021 मध्ये चेन्नईतर्फे राजस्थान रॉयल्सविरुद्ध अबुधाबी येथे आपला शेवटचा व्यावसायिक सामना खेळला आहे. भारतीय संघातर्फे रैनाने 18 कसोटी, 226 वनडे व 78 टी-20 खेळले आहेत. तो 2011 विश्वचषक जेत्या संघाचाही सदस्य राहिला आहे.









