पीआर श्रीजेश, सविताचे सर्वोत्तम गोलरक्षकांसाठी नामांकन
वृत्तसंस्था/ लुसाने
2021-22 हॉकी हंगामातील आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनतर्फे सर्वोत्तम पुरुष आणि महिला हॉकीपटू पुरस्कारासाठी भारतीय पुरुष हॉकी संघातील हरमनप्रीत सिंगच्या नावाची शिफारस करण्यात आली आहे. पुरुष विभागातील पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आलेल्या पाच हॉकीपटूंमध्ये त्याचा समावेश आहे. त्याचप्रमाणे सर्वोत्तम पुरुष आणि महिला गोलरक्षक पुरस्काराकरिता भारताचे गोलरक्षक पी. आर. श्रीजेश आणि सविता पुनिया यांना नामांकन मिळाले आहे.

2021-22 हंगामातील विविध देशांच्या हॉकीपटूंच्या कामगिरीचा आढावा या पुरस्कारासाठी घेतला जातो. त्यानंतरच अंतिम पाच हॉकीपटूंची शिफारस केली जाते. पुरुष विभागात भारतीय हॉकी संघाचा उपकर्णधार हरमनप्रीत सिंग बेल्जियमचे आर्थर डी स्लोवेर आणि टॉम बून, जर्मनीचा निकलास विलेन आणि हॉलंडचा थिएरी ब्रिंकमन यांची शिफारस करण्यात आली आहे. मात्र, महिलांच्या विभागात सर्वोत्तम पुरस्काराकरिता भारताच्या एकाही खेळाडूची शिफारस करण्यात आलेली नाही.
गेल्या वर्षी भारताच्या हरमनप्रीत सिंगने आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनचा सर्वोत्तम पुरुष हॉकीपटूचा पुरस्कार मिळविला होता. टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय पुरुष हॉकी संघाने कांस्यपदक मिळवून दर्जेदार कामगिरी केली होती. 41 वर्षानंतर पहिल्यांदाच भारताला हॉकीमध्ये ऑलिम्पिक पदक मिळाले होते. मात्र, टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतीय महिला संघाला चांगले प्रदर्शन करूनही चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले. गेल्या वर्षी भारताच्या पुरुष हॉकी संघाचे प्रशिक्षक ग्रॅहॅम रिड, पी. आर. श्रीजेश आणि सविता यांनी आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनचे पुरस्कार मिळविले होते.
आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनच्या प्रत्येक वर्षी देण्यात येणाऱया या पुरस्कारासाठी या फेडरेशनतर्फे एका तज्ञ समितीची नियुक्ती केली असून त्यामध्ये माजी हॉकीपटू, प्रशिक्षक आणि इतर अधिकाऱयांचा समावेश आहे. आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनच्या खेळविल्या जाणाऱया हॉकी प्रो लिग, महिलांची विश्वचषक हॉकी स्पर्धा, कनिष्ठांची विश्वचषक हॉकी स्पर्धा, वरिष्ठ गटासाठी आंतरखंडीय चॅम्पियनशिप स्पर्धामधील हॉकीपटूंच्या कामगिरींचा आढावा घेतला जातो.
सर्वोत्तम हॉकीपटूंसाठी नामांकन ः महिला-हॉलंडची फेलिसी अल्बर्स, अर्जेंटिनाची मारिया जोस ग्रेनेटो, हॉलंडची माटला, अर्जेंटिनाची अगुस्तिना गोर्झेलॅनी आणि स्पेनची जॉर्जिना ऑलिव्हा. पुरुष-बेल्जियमचा आर्थर डी स्लूव्हेर, भारताचा हरमनप्रीत सिंग, जर्मनीचा निकालस विलेन, हॉलंडचा थिएरी ब्रिंकमन आणि बेल्जियमचा टॉम बून.
सर्वोत्तम गोलरक्षक पुरस्कारासाठी शिफारस- महिला- भारताची सविता, हॉलंडची कोनिंग, अर्जेंटिनाची बेलेन सुसी, ऑस्ट्रेलियाची जोसलीन बेरट्रम आणि दक्षिण आफ्रिकेची पी. एम्बान्डे. पुरुष-लोई व्हान डोरेन बेल्जियम, पीआर श्रीजेश भारत, पर्मिन ब्लाक हॉलंड, ऑर्थर थिएफ्री फ्रान्स, अलेक्झांडर स्टॅडलर जर्मनी.









