दक्षिण कोरियात चक्रीवादळामुळे वीजपुरवठा ठप्प
वृत्तसंस्था / बीजिंग
चीनच्या सिचुआन प्रांतात सोमवारी झालेल्या भूकंपामुळे मोठे नुकसान झाले आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे आतापर्यंत 65 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 16 जण बेपत्ता आहेत. भूकंपाची तीव्रता अधिक असल्याने अनेक इमारती ढिगाऱयात रुपातंरित झाल्या आहेत. भूकंपाचे केंद्र लुडिंग काउंटीत होते आणि याची रिश्टर स्केलवर तीव्रता 6.8 इतकी होती. सिचुआन प्रांत यापूर्वीच कोरोनासंकट अन् अभूतपूर्व दुष्काळाला सामोरा जात आहे.
गांजी अन् याआन येथे अडकून पडलेल्या 50 हजारांहून अधिक लोकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे. याचबरोबर सिचुआनमध्ये 6,500 हून अधिक बचावपथके, चार हेलिकॉप्टर्स अन् दोन मानवरहित हवाईयानांना तैनात करण्यात आले आहे. तसेच अग्निशमन दलाच्या 1100 पथकांना बचावकार्यात सामील करण्यात आले आहे. चीनच्या अर्थ अन् आपत्कालीन व्यवस्थापन मंत्रालयाने बचाव तसेच मदतकार्यांकरता 50 दशलक्ष युआन (सुमारे 7.25 दशलक्ष डॉलर्स) उपलब्ध केले आहेत. भूकंपाच्या पार्श्वभूमीवर अध्यक्ष क्षी जिनपिंग यांनी वेगाने बचावकार्य राबविण्याचा आदेश दिला आहे. सिचुआन प्रांत तिबेटनजीक असून भूकंपाच्या दृष्टीने संवेदनशील आहे. चीनच्या याच प्रांतात 2008 साली झालेल्या भूकंपाची तीव्रता 8.2 इतकी होती, तेव्हा 69 हजारांहून अधिक लोकांना जीव गमवावा लागला होता.
चेंगदूमध्ये लॉकडाउन
सिचुआन प्रांताची राजधानी चेंगदूमध्ये कोरोनाबाधितांची संख्या वाढल्याने लॉकडाउन लागू करण्यात आले आहे. रहिवाशांना घरातच राहण्याचा निर्देश देण्यात आला आहे. प्रत्येक घरातील केवळ एका व्यक्तीला प्रतिदिन आवश्यक सामग्री खरेदी करण्यासाठी बाहेर पडण्यास अनुमती देण्यात आली आहे.
दक्षिण कोरियात चक्रीवादळाचे संकट
दक्षिण कोरियात हिनाममोर चक्रीवादळामुळे हजारो घरांचा वीजपुरवठा ठप्प झाला आहे. या चक्रीवादळामुळे 20 हजारांहून अधिक लोकांना सुरक्षितस्थळी धाव घ्यावी लागली आहे. अतिवृष्टी अन् वेगवान वाऱयांमुळे मोठे नुकसान झाले आहे.









