विरोधी पक्षांना एकत्र आणण्याचा करतोय प्रयत्न
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
बिहारमध्ये महाआघाडीने सरकार स्थापन केल्यावर पहिल्यांदाच दिल्लीत पोहोचलेले मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांची सोमवारी भेट घेत विरोधी पक्षांना एकजूट करण्याचे प्रयत्न दाखवून दिले होते. नितीश कुमार यांनी मंगळवारी दिल्लीत डाव्या पक्षांच्या नेत्यांची भेट घेतली आहे. देशातील सर्व प्रादेशिक पक्ष, डावे आणि काँग्रेस एकत्र आल्यास मोठा फरक पडणार आहे. पंतप्रधानपदासाठी मी उमेदवार नाही आणि माझी दावेदारी देखील नाही. विरोधी पक्षांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करत असल्याचे नितीश यांनी यावेळी म्हटले आहे.
नितीश यांनी मंगळवारी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची भेट घेतली आहे. छोटे-मोठे मतभेद बाजूला ठेवत मोठय़ा लक्ष्यासाठी विरोधी पक्षांनी एकजूट व्हावे असे नितीश कुमार यांच्या पक्षाने म्हटले आहे.
पंतप्रधन होण्याची माझी इच्छा नाही तसेच आकांक्षा देखील नाही. विरोधी पक्ष एकत्र आल्यास सर्वकाही सुरळीत होईल असे आमचे मानणे आहे. सर्व पक्षांसोबत चर्चा झाल्यावरच याबाबतचे परिणाम दिसू लागतील असे नितीश यांनी म्हटले आहे.
नितीश कुमार हे प्रत्येक दरवाज्यासमोर जाण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यांच्यापूर्वी अनेक जणांनी अशी भ्रमंती केली होती, परंतु त्यातून काहीच साध्य झालेले नाही. पंतप्रधान पद रिक्त नाही, तुमच्यापूर्वी अनेक दावेदार विरोधी पक्षात यापूर्वीच उभे आहेत. तुम्हीही रांगेत उभे रहा अशा शब्दांत भाजप नेते रविशंकर प्रसाद यांनी नितीश कुमार यांना लक्ष्य केले आहे.
वैयक्तिक महत्त्वाकांक्षा अन् खुर्चीची आस यासाठी नितीश कुमार हे दिल्लीत प्रयत्न करत आहेत. हेच प्रयत्न त्यांनी बिहारमध्ये विकासाचे प्रकल्प आणि उद्योग आणण्यासाठी केले असते तर अनेक बिहारी युवक-युवतींना रोजगार मिळाला असता अशी टीका भाजप नेत्याने केली आहे.









