आमदार विजय सरदेसाई यांचे मत, पालिकेने आणलेल्या सफाई यंत्रांची पाहणी
प्रतिनिधी /मडगाव
एखादा प्रकल्प उभा राहिल्यानंतर वा विकासकाम राबविल्यानंतर त्याची देखभाल ठेवणे तेवढेच महत्त्चाचे असल्याचे फातोर्डाचे आमदार विजय सरदेसाई यांनी सांगितले आहे व संबंधित अधिकारिणींनी त्यासाठी पुढाकार घेण्याची आवश्यकता व्यक्त केली आहे.
मडगाव पालिकेने फातोर्डा व मडगाव मतदारसंघांतील पदपथ तसेच महत्त्वाच्या प्रकल्पांची साफसफाई करण्यासाठी दोन यंत्रे नुकतीच खरेदी केली आहेत. ही यंत्रे रिक्षाला जोडलेली असून याद्वारे पाणी फवारणी करून तसेच साफसफाई करून फरशा, भिंतीवरील बुरशी व अन्य डाग हटविले जातात. फातोर्डातील ओपिनियन पोल चौकनजीकच्या पदपथ तसेच तेथील बाकडय़ांची साफसफाई करण्यात येत असताना आमदार सरदेसाई यांनी सोमवारी सायंकाळी पाहणी केली.
सदर साफसफाई करणाऱया एजन्सीच्या प्रतिनिधीकडून सरदेसाई यांनी या यंत्राच्या कार्यक्षमतेबद्दल माहिती जाणून घेतली. पालिकेने खरेदी केलेली ही साफसफाई यंत्रे कशी काम करतात हे जाणून घेण्यासाठी मी येथे उपस्थिती लावली. प्रथमदर्शनी यंत्राद्वारे सफाई होत असल्याचे दिसते. जर ती कूचकामी ठरली, तर ती वापरात न आणता संबंधित यंत्रणेला परत करावी लागतील, असे सरदेसाई यांनी स्पष्ट केले. ज्या ठिकाणांवर लोक जास्त भर देतात अशा फातोर्डा ओपिनियन पोल चौक, फॉरवर्ड ऍव्हेन्यू याखेरीज दामोदर शिवलिंग मंदिर परिसर आदी ठिकाणी ही यंत्रे वापरात आणणे शक्य आहे, असे सरदेसाई यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.









