उमरिया / वृत्तसंस्था
मध्यप्रदेशातील उमरिया येथे एका 25 वर्षीय मातेने आपल्या रांगत्या वयाच्या पुत्राची मोठय़ा धाडसाने वाघाच्या तावडीतून सुटका केल्याची घटना घडली आहे. तिच्या 15 महिन्याच्या मुलाची मान वाघाने आपल्या जबडय़ात पकडली होती. तथापि, या महिलेने धीर न सोडता त्या वाघावरच हल्ला करुन मुलाची सुखरुप सुटका केली. या प्रयत्नांमध्ये ती महिला जखमी झाली. महिला आणि तिचा पुत्र यांच्यावर उपचार सुरु असून दोघेही धोक्याच्या बाहेर आहेत, असे स्पष्ट करण्यात आले. उर्मिला चौधरी असे या महिलेचे नाव आहे. तिच्या धाडसाचे कौतुक मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान यांनी केले आहे.








