वार्ताहर /धामणे
सुळगे (ये.) मुख्य रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत आहे. सुळगे (ये.) रस्ता येळ्ळूरपासून सुळगे गावातून पुढे देसूर, नंदिहळ्ळी रोडला जोडला आहे. त्यामुळे या रस्त्याने अवजड आणि इतर वाहनांची वर्दळ जास्त आहे. परंतु सुळगे गावाजवळ या रस्त्यावर मोठमोठे खड्डे निर्माण झाल्याने येथून वाहन चालवताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. या रस्त्याने राजहंसगडावर जाणाऱया पर्यटकांची वर्दळ आहे. त्याचप्रमाणे देसूर, गर्लगुंजी, इदलहोंड येथून बेळगाव शहराकडे विटा, वाळू वाहतूक करणारी वाहने, शहराकडे येणारे शाळा-कॉलेजचे विद्यार्थी दुचाकीने ये-जा करतात. या रस्त्यावरून वाहन चालविणे धोक्याचे झाले आहे.
गेल्या तीन महिन्यांपासून रस्त्याच्या दुरुस्तीकडे शासनाचे साफ दुर्लक्ष झाल्याने वाहनधारकांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे. आतातरी संबंधित वरिष्ठ अधिकाऱयांनी या रस्त्यावर निर्माण झालेले खड्डे बुजवून वाहनधारकांना दिलासा द्यावा, अशी मागणी वाहनधारकांतून जोर धरत आहे.









