सुपर-4 फेरीत आज दोन्ही कट्टर, पारंपरिक प्रतिस्पर्धी आमनेसामने भिडणार
दुबई / वृत्तसंस्था
आशिया चषक स्पर्धेच्या निमित्ताने भारत-पाकिस्तान यांच्यात आज (रविवार दि. 4) सलग दुसऱया रविवारी ब्लॉकबस्टर लढत रंगणार असून चाहत्यांना पुन्हा एकदा सुपर संडेची मेजवानी लाभेल. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ प्रामुख्याने आघाडी फळीतील कोर्स करेक्शनवर मुख्य फोकस ठेवेल, अशी अपेक्षा आहे. ही लढत भारतीय प्रमाणवेळेनुसार सायंकाळी 7.30 वाजता खेळवली जाईल.
भारताच्या दृष्टीने टॉप ऑर्डरची पॉवर प्ले फिलॉसॉफी चिंतेची ठरत आली असून गोलंदाजीत डेथ ओव्हर्समध्ये अवेश खानचा खराब फॉर्म देखील डोकेदुखी ठरत आली आहे. पाकिस्तानचा संघ नुकताच हाँगकाँगचा तब्बल 155 धावांनी फडशा पाडून येथे मैदानात उतरत असल्याने भारतीय संघव्यवस्थापनाला विशेषतः आपल्या गोलंदाजी लाईनअपविषयी गांभीर्याने विचार करावा लागू शकतो.
डावखुरा अष्टपैलू रविंद्र जडेजा उर्वरित स्पर्धेत खेळू शकणार नाही. त्या पार्श्वभूमीवर, अक्षर पटेलला थेट संधी मिळू शकते. पण, जडेजाची उणीव यानंतरही जाणवू शकते. यापूर्वी, पाकिस्तानविरुद्ध साखळी लढतीत मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी रविंद्र जडेजाला चौथ्या स्थानी बढती देत लेफ्ट-राईट कॉम्बिनेशनवर भर दिला आणि ती चाल उत्तम फळली होती. रिषभ पंतला त्यावेळी अंतिम एकादशमधून वगळले गेले होते.
आज पुन्हा एकदा पाकिस्तानसारख्या कट्टर प्रतिस्पर्धी संघाला सामोरे जाताना कर्णधार रोहित शर्मा व मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड कोणती रणनीती अवलंबणार, याची उत्सुकता असेल. टॉप-सिक्समध्ये एखादा डावखुरा फलंदाज खेळवण्याचे निश्चित झाले तर त्यादृष्टीने अक्षर पटेल, रिषभ पंतचे पर्याय हाताशी असतील. मागील रविवारी हार्दिक पंडय़ाच्या ‘वन मॅन शो’मुळे भारताने शेवटच्या षटकात रोमांचक विजय मिळवला आणि आजच्या लढतीतही आपले संघसहकारी त्याचीच पुनरावृत्ती करतील, अशी कर्णधार रोहितला अपेक्षा असेल.
यापूर्वी, पाकिस्तानविरुद्ध लढतीत विराट कोहली व रोहित शर्मा हे दोन्ही दिग्गज फलंदाज आत्मविश्वासाने फलंदाजी करताना दिसून आले नाहीत आणि पिच स्लो होत जात असताना धावगती मंदावते, असेही स्पष्ट होत होते. मात्र, सूर्यकुमार यादवच्या फटकेबाजीमुळे चित्र बदलत गेले. हाँगकाँगसारख्या संघातील नवख्या गोलंदाजांना सामोरे जाताना केएल राहुलने 39 चेंडूत 36 धावा, अशी संथ फलंदाजी केली, ते आश्चर्याचे होते.
प्रारंभी फटकेबाजीचा पाकिस्तानचा निर्धार
पाकिस्तानचा संघ पहिल्या 10 षटकात आणखी फटकेबाजीवर भर देण्यासाठी प्रयत्नशील असेल, असे संकेत आहेत. मोहम्मद रिझवान व बाबर आझम धावांचा पाठलाग करताना बरेच यशस्वी झाले आहेत. मात्र, त्याची पुनरावृत्ती प्रथम फलंदाजी करताना होऊ शकलेली नाही. दुबईतील खेळपट्टी संथ असल्याने फलंदाजांना मनमुराद फटकेबाजी करता येत नाही, हे देखील सातत्याने स्पष्ट होत आले आहे. अवेश खान व अर्शदीप या दोन्ही गोलंदाजांचा अंतिम एकादशमध्ये समावेश होणार का, हे देखील पहावे लागेल.
अक्षर पटेल फटकेबाजी रोखू शकतो. तसेच, दीपक हुडाचा फलंदाजी अष्टपैलू किंवा रविचंदन अश्विनचा गोलंदाजी अष्टपैलू म्हणून समावेश केला जाऊ शकतो. त्यामुळे, ते पर्यायही हाताशी असतील. पाकिस्तानच्या टॉप-6 मध्ये फखर झमान व खुशदिल शाह असे दोघे डावखुरे फलंदाज असल्याने ऑफस्पिनर त्यांच्यासमोर अधिक उपयुक्त गोलंदाजी करु शकतो. जलद गोलंदाजीच्या आघाडीवर भुवनेश्वर व हार्दिक पूर्ण बहरात असल्याने ही भारताची जमेची बाजू ठरु शकते.
संभाव्य संघ
भारत ः रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत, दीपक हुडा, दिनेश कार्तिक, हार्दिक पंडय़ा, अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, यजुवेंद्र चहल, रवि बिश्नोई, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंग, अवेश खान.
पाकिस्तान ः बाबर आझम (कर्णधार), शदाब खान, असिफ अली, फखर झमान, हैदर अली, हॅरिस रौफ, इफ्तिकार अहमद, खुशदिल शाह, मोहम्मद नवाझ, मोहम्मद रिझवान, नसीम शाह, शाहनवाज दहानी, उस्मान कादिर, मोहम्मद हसनैन, हसन अली.
सामन्याची वेळ ः सायं. 7.30 वा.

भारत ‘टॉप-थ्री’मध्ये बदल करणार का?
केएल राहुल, रोहित शर्मा व विराट कोहली हे दिग्गज त्रिकुट अद्याप अपेक्षा पूर्ण करु शकलेले नाहीत, ही वस्तुस्थिती समोर असल्याने भारतीय संघव्यवस्थापन या लाईनअपमध्ये काही बदल करणार का, याची आज उत्सुकता असेल. मागील रविवारच्या सामन्यात केएल राहुल आपल्या पहिल्याच चेंडूवर बाद झाला होता, ते लक्षात घेता त्याला आणखी एक संधी मिळाल्यास त्यात काही गैर नसेल. मात्र, केएल राहुलला देखील पुन्हा ताज्या दमाने परतण्यासाठी येथे विश्रांती देण्यात येईल का, याचे उत्तर आज निवडीत मिळेल.
मोहम्मद रिझवान म्हणतो, आम्ही कोणत्याही प्रतिस्पर्ध्यासाठी सज्ज!

शेवटच्या साखळी सामन्यात हाँगकाँगचा 155 धावांनी धुव्वा उडवल्यानंतर पाकिस्तानचा स्टार फलंदाज मोहम्मद रिझवान याने आपला संघ आता कोणत्याही प्रतिस्पर्ध्याला सामोरे जाण्यासाठी पूर्ण सज्ज असल्याचे म्हटले आहे. रिझवानने नाबाद 78 धावांची खेळी साकारत दुबळय़ा हाँगकाँगविरुद्ध त्या एकतर्फी विजयात मोलाचा वाटा उचलला होता. शिवाय, शदाब खानने 4 बळी घेतले होते.
विराट कोहलीचा ‘हाय-ऍल्टिटय़ूड मास्क’सह सराव

पाकिस्तानविरुद्ध हाय व्होल्टेज लढतीपूर्वी भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीने संघसहकाऱयांसमवेत कसून सराव केला. या सराव सत्रादरम्यान त्याने परिधान केलेला ‘हाय-ऍल्टिटय़ूड मास्क’ चर्चेत राहिला. विराट कोहली अलीकडील कालावधीत आपल्या खराब फॉर्ममुळे रडारवर असून त्याला लवकरच सूर मिळेल, अशी अपेक्षा साहजिक आहे.
साधारणपणे हजारभर दिवसांपूर्वी शेवटचे आंतरराष्ट्रीय शतक झळकावलेल्या या दिग्गज फलंदाजाने त्यानंतर सर्व क्रिकेट प्रकारातील 70 सामन्यात 2648 धावा जमवल्या. यादरम्यान त्याची सरासरी 34.84 इतकी किरकोळ राहिली. त्याने 25 अर्धशतके नोंदवली. 2022 चे वर्ष विराटसाठी आणखी खडतर ठरत आले. यंदा विराटने केवळ 6 टी-20 सामने खेळले असून त्यात 35.00 च्या सरासरीने 175 धावा केल्या. या क्रिकेट प्रकारात नाबाद 59 ही त्याची सर्वोच्च धावसंख्या ठरली.
या वर्षात सर्व क्रिकेट प्रकारात त्याने 18 सामने व 21 डावात भारताचे प्रतिनिधीत्व केले असून त्याला 28.50 च्या सरासरीने केवळ 570 धावा जमवता आल्या आहेत. यादरम्यान त्याने केवळ 5 अर्धशतके फटकावली आणि 79 ही त्याची सर्वोच्च धावसंख्या ठरली.
सध्या सुरु असलेल्या आशिया चषक स्पर्धेत मात्र त्याने तुलनेत आपली कामगिरी बरीच सुधारली आहे. आतापर्यंत खेळलेल्या 2 सामन्यात त्याने 94.00 च्या सरासरीने 94 धावा केल्या. हाँगकाँगविरुद्ध नाबाद 59 ही त्याची सर्वोच्च खेळी असून तो आतापर्यंत स्पर्धेत सर्वाधिक धावा जमवणाऱया फलंदाजांच्या यादीत दुसऱया स्थानी आहे. पाकिस्तानचा मोहम्मद रिझवान 2 सामन्यात 121 धावांसह अव्वलस्थानी विराजमान आहे.









