वहाळ-सावर्डे मार्गावरील घटना, धडक देणाऱ्या दुचाकीस्वारावर गुन्हा दाखल
चिपळूण प्रतिनिधी
दोन मोटारसायकलींच्या शुक्रवारी दुपारी 2 च्या सुमारास वहाळ ते सावर्डे मार्गावरील वहाळ भरटवाडी येथे झालेल्या अपघातात पतीचा मृत्यू झाल्याची घटना घडली, तर यात पत्नीदेखील जखमी झाली आहे. ऐन गणेशोत्सवात घडलेल्या या घटनेने हळहळ व्यक्त होत आहे. सचिन नारायण भागडे (आबिटगाव) असे मृत्यू झालेल्याचे, तर नंदकुमार रमेश पाडावे (35, पुर्ये तर्फे सावर्डे) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे.
याबाबतची फिर्याद पत्नी शुभ्रा सचिन भागडे (30, अबिटगाव) यांनी सावर्डे पोलीस स्थानकात फिर्याद दिली आहे. त्यानुसार नंदकुमार पाडावे या दुचाकीस्वारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सचिन भागडे व त्यांची पत्नी शुभ्रा हे दोघेजण दुचाकीने घरी जात होते. याचवेळी नंदकुमार पाडावे हा वहाळ भरटवाडी येथे आला असता त्याने त्याच्या ताब्यातील दुचाकी अतिवेगाने चालवून सचिन भागडे यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात सचिन भागडे यांना गंभीर दुखापत झाल्याने यातच त्यांचा मृत्यू झाला. शुभ्रा यांनादेखील दुखापत झाली आहे. या अपघातपकरणी नंदकुमार पाडावे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, भाऊ, बहीण असा परिवार आहे.









