मंडोळीत शुक्रवारी दिवसभर वनखात्याचे अधिकारी ठाण मांडून : सापळा-कॅमेऱयांद्वारे परिसराची पाहणी
वार्ताहर /किणये
मंडोळी परिसरात बुधवारी सकाळी गवत आणण्यासाठी गेलेल्या कल्लाप्पा साळवी यांना व गुरुवारी सकाळी मोरारजी देसाई शाळेजवळ एका महिलेला बिबटय़ासदृश प्राणी दिसल्यामुळे मंडोळी परिसरात शोधमोहीम गतिमान करण्यात आली आहे. शुक्रवारी दिवसभर वनखात्याच्या अधिकाऱयांनी या भागाची पाहणी केली. मात्र अद्याप कोणताही सुगावा लागला नाही.
बुधवारी सकाळी मंडोळी गावापासून अर्धा किलोमीटर डोंगर भागाकडे असलेल्या शिवारात कल्लाप्पा साळवी हे चारा आणण्यासाठी गेले असता बिबटय़ासदृश प्राणी त्यांच्या निदर्शनास आला. तसेच मोरारजी देसाई शाळेजवळ गुरुवारी सकाळी एका महिलेला व विद्यार्थिनीला बिबटय़ासदृश प्राणी दिसला. यामुळे दोन दिवस वनखात्याच्या अधिकाऱयांनी या परिसरात पाहणी केली. सदर प्राणी हा बिबटय़ाच आहे की अन्य कोणता आहे, याचा शोध घेण्यासाठी शुक्रवारी दिवसभर या परिसरात वनखात्याचे अधिकारी ठाण मांडून होते. वनखात्याचे अधिकारी रमेश गिरपण्णावर, डी. एस. बंडी, राहुल बोंगाळे, जालसिंग रजपूत आदींनी शुक्रवारी सकाळी या संपूर्ण परिसराची पाहणी केली. त्यानंतर या अधिकाऱयांनी ग्राम पंचायत अध्यक्षा अश्विनी तळवरकर, पीडीओ ज्योती मेटी यांच्याशी सविस्तर चर्चा केली.
बिबटय़ासदृश प्राणी दिसलेल्या भागात अजूनही सापळा लावण्यात आला आहे. तसेच मोरारजी देसाई शाळेजवळ दोन सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. या कॅमेऱयांमध्ये कोणत्याही प्राण्याची छबी आलेली नाही. तसेच परिसराची पाहणी केल्यानंतर बिबटय़ा अथवा बिबटय़ासदृश प्राण्याच्या पायाचे ठसेही सापडलेले नाहीत, अशी माहिती वनखात्याचे अधिकारी जालसिंग रजपूत यांनी दिली आहे. त्यामुळे मंडोळी भागातील नागरिकांनी कोणत्याही प्रकारची भीती बाळगू नये, फक्त या परिसरात फिरताना सावधगिरी बाळगावी, वनखात्यामार्फत सदर प्राण्याचा शोध घेण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती अधिकाऱयांनी दिली.
असू भागात पट्टेरी वाघाचे दर्शन
रामनगर : जोयडा तालुक्मयातील असूनजीक असू-रामनगर मार्गावरील लक्ष्मी विसर्जन केलेल्या भागात मोठा पट्टेरी वाघ रस्ता ओलांडत असताना वाहनधारकांना शुक्रवारी संध्याकाळी निदर्शनास आला. हा वाघ पाहून दुचाकीस्वारांची घाबरगुंडी उडाली. या भागात बिबटय़ाचा वावर असतो. परंतु पट्टेरी वाघ चुकूनच निदर्शनास येतो. सदर वाघ या परिसरात फिरत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.









