मनपाकडून फिरत्या वाहनांची सोय : बहुतांश श्रीमूर्तीचे तलावामध्ये विसर्जन
प्रतिनिधी /बेळगाव
पंरपरेनुसार काही भाविक दीड दिवसानंतर गणरायांचे विसर्जन करतात. दीड दिवसाच्या गणरायांना निरोप देण्यासाठी महापालिकेने फिरत्या वाहनांची व्यवस्था करून विसर्जनाची सुविधा उपलब्ध केली होती. मात्र या उपक्रमाला नागरिकांकडून थंडा प्रतिसाद मिळाला. बहुतांश करून भाविकांनी तलावामध्ये श्रीमूर्तीचे विसर्जन केले.
प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीची प्रति÷ापना करू नये, अशी सूचना प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि प्रशासनाने केली आहे. विहीर आणि वाहत्या पाण्यामध्ये श्रीमूर्तीचे विसर्जन करू नये, याकरिता फिरत्या वाहनांची व्यवस्था करून गणेश विसर्जनाची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.
दीड दिवसाच्या गणरायांचे विसर्जन करण्यासाठी महापालिकेने वाहन उपलब्ध करून आठ ठिकाणी विसर्जनाची व्यवस्था केली होती. दुपारी 3 वाजल्यापासून रात्री 10 वाजेपर्यंत वाहन उपलब्ध करण्यात आले होते. ठरलेल्या स्थळी श्रीमूर्ती विसर्जनासाठी प्रत्येक ठिकाणी 1 तास वाहन थांबविण्यात आले होते. तसेच फोनद्वारे संपर्क साधलेल्या नागरिकांच्या घरी जाऊन श्रीमूर्ती विसर्जन करण्यात आले. या वाहनावर महापालिकेच्या कर्मचाऱयांची नियुक्ती करण्यात आली होती. दुपारपर्यंत चार ठिकाणी वाहन थांबविण्यात आले होते. पण केवळ दोन गणेश मूर्तींचे विसर्जन वाहनामधील टाकीमध्ये करण्यात आले. त्यानंतर रात्री उशीरापर्यंत ठिकठिकाणी हे वाहन उपलब्ध करण्यात आले होते. पण या उपक्रमाला नागरिकांकडून म्हणावा तितका प्रतिसाद लाभला नाही. भाविकांनी विसर्जन तलावामध्येच दीड दिवसाच्या गणपतीचे विसर्जन केले.









