लोकमान्य सोसायटीचे 28 व्या वर्षात पदार्पण : गुरुवारपेठ येथील कार्यालयात कार्यक्रम
प्रतिनिधी /बेळगाव
सभासदांनी दाखविलेला विश्वास आणि जनतेच्या शुभेच्छा यांच्या बळावर ‘लोकमान्य सोसायटी’ने उत्तम काम केले आहे. यापुढेही सोसायटी ग्राहकांच्या हिताचा विचार करत सामाजिक बांधिलकी जपत कार्य करेल, अशी ग्वाही लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटीचे संस्थापक व चेअरमन किरण ठाकुर यांनी दिली.
लोकमान्य सोसायटीने 27 वर्षे पूर्ण करून 28 व्या वर्षात पदार्पण केले आहे. यानिमित्त गुरुवारपेठ येथील कार्यालयात आयोजित कार्यक्रमात किरण ठाकुर बोलत होते. याप्रसंगी संचालक प्रसाद ठाकुर व उपाध्यक्ष अजित गरगट्टी, संचालक पंढरी परब, गजानन धामणेकर, सुबोध गावडे, प्रभाकर पाटकर, विठ्ठल प्रभू, डॉ. डी. पी. वागळे आदी उपस्थित होते.
किरण ठाकुर व अन्य मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन केले. सारिका व सुबोध गावडे यांनी सत्यनारायण पूजेचे यजमानपद स्वीकारले. यावेळी किरण ठाकुर म्हणाले, सामाजिक बांधिलकी हे उद्दिष्ट ठेवून लोकमान्य सोसायटी स्थापन केली. लोकमान्य टिळकांनी सुरू केलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवाची परंपरा अखंड रहावी व उत्सवाला शिस्त लागावी, या हेतूने सोसायटीने देणग्या दिल्या आहेत. विनम्र व तत्पर सेवेमुळे ग्राहक टिकून राहतात, हे लक्षात घ्यायला हवे, असे सांगून कर्मचारीवर्गाने सुद्धा उत्तम काम केल्याचा उल्लेख त्यांनी केला.
याप्रसंगी प्रसाद ठाकुर म्हणाले, 27 वर्षांच्या कालखंडात आपण किती प्रगती केली, याचे चिंतन करायला हवे. वेळेच्या नियोजनाअभावी धावपळ होते. ती टाळणे शक्मय आहे. आपली निर्मिती क्षमता काय? प्रत्येक दिवशी आपण किती प्रगती केली? काय साध्य केले? याचा विचार करायला हवा. किरण ठाकुर हे आपल्याला मार्गदर्शन करतील. परंतु आपल्याला स्वतःमध्ये बदल घडवायचा आहे. न पटणारी गोष्ट मी करणार नाही, इतका ठामपणा आपल्यामध्ये असायला हवा. सूत्रसंचालन विनायक जाधव यांनी केले. किरण गावडे, दीपक गुरुंग आदी उपस्थित होते.









