भुईंज पोलिसांनी उत्तराखंड येथे जाऊन आवळल्या चोरट्यांच्या मुसक्या; चोरीतील 175 ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत
पाचवड प्रतिनिधी
वाई तालुक्यातील कवठे येथील राज हॉटेल समोर थांबलेल्या शिवशाही बसमधून सुमारे 21 लाखाचे दागिने चोरीला गेल्याचा गुन्हा भुईंज पोलीस ठाण्यात दाखल झाला होता. याच गुन्ह्याची उकल भुईंज पोलिसांनी केली असून उत्तराखंड येथून चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत. त्यांच्याकडून चोरी गेलेल्या मुद्देमालातील सुमारे 175 ग्रॅम सोने हस्तगत केले आहे.
भुईंज पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, कवठे येथील हॉटेल राज येथे दि.12 आगस्ट रोजी सायंकाळी कोल्हापूरकडे निघालेली शिवशाही बस थांबली होती. त्याच दरम्यान बसमधून सुमारे 21 लाख 46 हजाराचे दागिने असलेली बॅग चोरट्यानी चोरी केल्याची बाब निदर्शनास येताच भुईंज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. भुईंज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आशिष कांबळे यांनी याचा छडा लावण्यासाठी तांत्रिक बाबींच्या अनुषंगाने गुन्हेगाराची माहिती मिळवली. गुन्हेगार हे उत्तराखंड येथे असल्याने भुईंज पोलीस ठाण्याचे पथक घेऊन तिथे पोहचले. त्यांनी तिथे या गुन्ह्यातल्या चोरीतील चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या असून त्यांची नावे महीपाल रामगोपाल सिंग (वय 40, रा.डेहराडून), वीरबहादूर रमेश सिंग (वय 42, रा.उत्तरप्रदेश), महेशकुमार दयाराम सिंग (वय 37, रा.उत्तराखंड) अशी असून त्यांच्याकडून चोरीतील 175 ग्रॅम सोने हस्तगत केले आहे. ही कारवाई भुईंज पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष कांबळे, पोलीस उपनिरीक्षक रत्नदीप भंडारे, एएसआय विकास गंगावणे, हवालदार विजय देशमुख, पो.ना.प्रशांत शिंदे, अतुल आवळे, पो.शि. रविराज वरणेकर, सोमनाथ बल्लाळ, सचिन नलवडे, सागर मोहिते, मंगेश आगम यांनी केली आहे.