अधीक्षक सोबित सक्सेना यांनी दिली माहिती : सोनाली फोगट खूनप्रकरण
प्रतिनिधी / पणजी
भाजप नेत्या आणि अभिनेत्री सोनाली फोगट यांच्या खून प्रकरणाचा तपास करण्यासाठी हरियाणा येथे गेलेल्या गोवा पोलिसांना काही महत्त्वाचे पुरावे मिळाले असल्याने खरा प्रकार काय आहे त्याचा उलगडा होणार असल्याचे उत्तर गोवा पोलीस अधीक्षक शोबित सक्सेना यांनी सांगितले आहे. हरियाणा येथे गेलेले पथक गोव्यात पोहचल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचेही शोबित सक्सेना म्हणाले.
गुन्हा अन्वेषण विभागाचे निरीक्षक थेरॉन यांच्या नेतृत्वाखाली एक टीम हरियाणा येथे गेली असून त्यांनी सोनाली फोगट यांच्या मुलीसह अन्य अनेक नातेवाईक तसेच सोनाली यांच्या जवळच्या व्यक्तींच्या जबान्या नोंद केल्या आहेत. सोनाली यांच्या हरियाणातील हिसार येथील घरालाही भेट दिली असून तिथेच काही महत्त्वाचे धागेदोरे सापडले असल्याचे शोबित सक्सेना यांनी सांगितले.
आणखीनही काहीजणांना अटक होणार
सोनाली फोगट खून प्रकरणात आतापर्यंत पाच संशयितांना हणजूण पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणात आणखीन काहीजणांचा नंबर लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे. या खून प्रकरणात दोन तक्रारी नोंद केल्या असून एक तक्रार खून प्रकरणाची असून दुसरी एनडीपीएस कायद्याखील नोंद करण्यात आली आहे. एनडीपीएस कायद्याखाली नोंद केलेल्या तक्रारीत तिघांना अटक केली असून या प्रकरणात लवकरच पोलिसांच्या गळाला मोठा मासा लागणार आहे. ड्रग्स पॅडलर मांद्रेकर याला ड्रग्स पुरवठा करणाऱया व्यक्तीचा शोध पोलीस घेत असून तो फरार असल्याचे पोलिसांना आढळून आले आहे.
सोनाली फोगट यांचा केवळ आर्थिक व्यवहार तपास करण्यासाठी गोवा पोलीस हरियाणा येथे आले आहेत. खुनामागचा मुख्य हेतू अद्याप गुलदस्त्यात आहे. त्याबाबत गोवा पोलिसांना विचारले असता ते काहीही सांगत नाही. तपासकाम केल्याचा केवळ दिखावा करून वेळ मारून नेण्याचे काम गोवा पोलीस करीत असल्याचे सोनाली फोगट यांचे भाऊ रिंकू धाका यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.









