ऑनलाईन टीम/तरुण भारत
मागील दोन वर्षे कोरोना महामारीमुळे गणेशोत्सव साधेपणाने साजरा केला गेला. आता कोरोनाचे संकट पूर्णपणे टळले नसले तरी त्याचे प्रमाण कमी झाले आहे. आता राज्यसरकारने सणांवरील निर्बंध उठवल्याने गणेशोत्सव (Ganesh Festival) मोठ्या धुमधडाक्यात साजरा केला जात आहे. तर राज्यातील आणि देशातील सत्ताधाऱ्यांकडून हिंदू सण ‘मोकळे’ केल्याचे ढोल बडवले जात असले तरी प्रत्यक्षात देशातील वातावरण खरोखरच ‘मोकळे’ राहिले आहे काय? असा सवाल करत शिवसेनेने (Shivsena) भाजपावर (BJP) शरसंधान केले आहे.
दरम्यान, महाराष्ट्रासह देशभरात काल सर्वांच्या लाडक्या बाप्पाचं आगमन झालं. अनेक लोकांनी गणरायाच्या मूर्तीची घरात स्थापना करून त्याचं दर्शन घेतलं तर अनेकांनी नवस केला आहे. याशिवाय काही लोकांनी बाप्पाकडे सुख आणि समृद्धीसाठी प्रार्थनाही केली असून आता शिवसेनेनं गणरायाला केलेल्या प्रार्थनेतून भाजपवर जोरदार हल्ला चढवला आहे. गेल्या काही दिवसांपासून देशातील लोकांचा श्वास महागाई आणि दडपशाहीमुळं कोंडला आहे. गणराया, तू सुखकर्ता आणि विघ्नहर्ता आहेस, देशातली जनता तुला निर्भय बनवण्याची प्रार्थना करत आहे, त्याचा स्वीकार कर, अशी बाप्पाकडे प्रार्थना करत शिवसेनेनं भाजपला टोला लगावला आहे.
गणरायाच्या आगमनासोबतच गौरीच्या स्वागताचीही जय्यत तयारी सर्वत्र झाली आहे. बाजारपेठा फुलल्या आहेत. हे सर्व राज्य सरकारने गणेशोत्सव ‘बंधनमुक्त’ केल्याने घडत आहे, अशी टिमकी काही मंडळी वाजवत असली तरी त्यात भक्तिभावापेक्षा राजकीय भावच जास्त आहे, हे राज्यातील गणेशभक्तही ओळखून आहेत, अशी खोचक टीका शिवसेनेने केली आहे.
हे ही वाचा : भाजप अण्णांचा बोलविता धनी; केजरीवालांचे प्रत्युत्तर
सत्ताधाऱ्यांकडून विरोधकांची मुस्कटदाबी…
राज्यातील आणि देशातील सत्ताधारी हिंदू सण निर्बंधमुक्त साजरं करण्याचं ढोल बडवत असले तरी प्रत्यक्षात देशात खरोखरच वातावरण मोकळं राहिलंय का? देशातील विरोधी पक्षांचे नेते आणि सरकारवर टीका करणारे लोकांची तपास यंत्रणाच्या माध्यमातून मुस्कटदाबी केली जात आहे. ज्या राज्यांमध्ये भाजपचं सरकार नाही, त्या राज्यातील सरकारं पाडली जात असून प्रादेशिक पक्षांना संपवण्याची भाषा केंद्रातील सत्ताधारी पक्षाचे अध्यक्ष करत आहेत. स्वातंत्र्य, घटनात्मक अधिकार, संविधानाची चौकट, धार्मिक एकोपा, लोकशाही, उच्च संसदीय परंपरा, राजकीय विरोधक या सर्वांचेच श्वास भाजपच्या दडपशाहीमुळं कोडला असल्याचा घणाघात शिवसेनेनं भाजपवर केला आहे.
विघ्नहर्त्याला साकडे
देशातील लोकशाही, उच्च संसदीय परंपरा, स्वातंत्र्य, घटनात्मक अधिकार, संविधानाची चौकट, धार्मिक एकोपा, राजकीय विरोधक अशा सगळ्यांचेच ‘श्वास’ सरकारी दडपशाहीमुळे कोंडले गेले आहेत. तिकडे देशातील सामान्य माणूस तरी ‘मोकळा’ कुठे आहे? बेरोजगारी आणि सतत वाढणारी महागाई या कोंडीत त्याचाही श्वास गुदमरलेलाच आहे. नवीन रोजगार राहिला बाजूला, आहे तो रोजगारदेखील हातून जात असल्याने ‘कमाई आणि महागाई’ यांचा ताळमेळ लावता लावता त्याची घालमेल होत आहे. रुपयाचे अवमूल्यन दिवसागणिक नया नीचांक गाठत आहे. एकीकडे महागाईचा फास आणि दुसरीकडे सरकारी दडपशाहीचा गळफास या कोंडीत देशाचा श्वास कोंडला आहे. कोरोनाचे संकट बऱ्यापैकी निवळले असले तरी दडपशाहीचे संकट कायमच आहे. गणराया, तू सुखकर्ता आणि विघ्नहर्ता आहेस. लोकशाही आणि घटनेने बहाल केलेले ‘मुक्त आणि निर्भय वातावरण’ निरंकुश सत्तालालसेच्या तावडीत सापडल्याने गुदमरले आहे. गणराया, देश ‘निर्भय’ कर, एवढीच प्रार्थना आज देशातील जनता तुला करीत आहे. तिचा स्वीकार कर, असे साकडे शिवसेनेने घातले आहे.
जनतेचा महागाईनं श्वास गुदमरला…
महागाई आणि कमाई याचा ताळमेळ बसत नाहीये. सतत वाढणारी महागाई आणि बेरोजगारीमुळं देशातील सामान्य जनतेचा श्वास गुदमरला आहे. नवीन रोजगार तर जाऊ द्या, आहे त्या नोकऱ्या जात आहे, सणासुदीच्या काळात अन्नधान्य, गॅस, मसाले, इंधन आणि फळं अशा अनेक वस्तूंचे दर वाढले आहे. आजपासून दुधाचेही भाव वाढत असल्यानं देशातील सामान्य माणसाचा श्वास गुदमरत असल्याचं शिवसेनेनं सामनाच्या अग्रलेखात म्हटलं आहे.