गणपतीपुळे येथे अजूनही जपली जातेय ‘एक गाव एक गणपती’ प्रथा
गणपतीपुळे वार्ताहर
रत्नागिरी तालुक्यातील जागतिक पर्यटन व धार्मिक स्थळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तसेच लाखो भक्ताचे श्रद्धास्थान असलेले श्री क्षेत्र गणपतीपुळे येथे बुधवार ३१ ऑगस्ट २०२२ रोजी गणेश चतुर्थी निमित्त हजारो भाविकांनी ‘श्रीं’चे स्पर्श दर्शन घेतले. गणपतीपुळे येथील श्रीं’ च्या मंदिरात श्रीं गणेश चतुर्थी निमित्त वर्षातून एकदाच साध्या वेशात स्पर्श दर्शन मिळते. यामुळे आज ‘श्रीं’च्या स्पर्श दर्शनासाठी ग्रामस्थ व भक्तांनी रात्री एक वाजल्यापासून दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या मंदिर पहाटे तीन वाजता उघडण्यात येऊन मंदिरामध्ये पूजा, अर्चा, मंत्रपुष्प आरती होऊन ‘श्रीं’ चे मंदिर सर्व भक्तांसाठी ४:३० वाजता स्पर्श दर्शनासाठी उघडण्यात आले. यावेळी गणपतीपुळेसह परिसरातील मालगुंड, वरवडे, निवेंडी, भगवतीनगर, भंडारपुळे, नेवरे आधी परिसरातील भाविक व ग्रामस्थांनी गर्दी केलेली दिसून येत होती. आज सर्व भाविकांनी दर्शन रांगेत उभे राहून स्पर्श दर्शन घेतले. भाविकांना रांगेतून व्यवस्थित दर्शन होण्यासाठी देवस्थान कर्मचारी सुरक्षा रक्षक मंदिराचे पुजारी यांनी विशेष मेहनत घेतली. गणपतीपुळे मंदिरामध्ये ‘श्रीं’ चे स्पर्श दर्शन दुपारी १२:३० वाजता बंद करण्यात आले. यानंतर ‘श्रीं’ची आरती होऊन मुर्तीसमोर फुलांच्या पाकळ्यापासून सुबक आरास मंदिराचे मुख्य पुजारी अमित घनवटकर यांनी काढली. तसेच आज श्री गणेश चतुर्थी निमित्त ‘श्रीं’च्या मंदिरात गणपतीपुळे येथील केदारवाडी व मानेवाडी यांनी भजनाचा कार्यक्रम सादर केला. तसेच मालगुंड येथील सुप्रसिद्ध रांगोळी व चित्रकार राहुल कळमटे यांनी ‘श्रीं’ ची सुबक रांगोळी तसेच अष्टविनायकाची रांगोळी काढली. हे आजच्या दिवसाचे खास आकर्षण ठरले. ढोल ताशाच्या गजरात भजन करत मंत्रपुष्प म्हणत मोठ्या उत्साहात व आनंदात ‘श्रीं’ ची पालखी प्रदक्षिणा सोहळा 4:30वाजता काढण्यात आला. यावेळी भक्त, पर्यटक, ग्रामस्थ, देवस्थान कर्मचारी, पोलीस कर्मचारी सहभागी होऊन पालखी प्रदिक्षणा सोहळा आनंदात पार पडला. गणपतीपुळे येथे ‘एक गाव एक गणपती’ ही पाचशे वर्षांपूर्वीची परंपरा आजही जोपासली जात असून गणपतीपुळे येथे घरोघरी गणपतीची मूर्ती आणून प्राणप्रतिष्णा करण्याची परंपरा नाही. ‘श्रीं’च्या मंदिरातील गणपती मानला जात असल्याने घरोघरी गौरी आणण्याची प्रथा आहे. गेल्या दोन वर्षांमध्ये कोरोनाचे निर्बंध असल्याने भक्त पर्यटकांना ‘श्रीं’ चे स्पर्श दर्शन घेता आले नाही. यंदा ही संधी मिळाली. तसेच निर्बंध नसल्यामुळे ग्रामस्थांनी मनोभावे ‘श्रीं’चे स्पर्श दर्शन घेऊन ‘श्रीं’ ची पूजा केली. त्यामुळे दोन वर्षांनी मिळालेल्या स्पर्श दर्शनामुळे परिसरामध्ये आनंदाचे व उत्साहाचे वातावरण पसरले आहे. सदरचे ‘श्रीं’ चे स्पर्श दर्शन ग्रामस्थ पर्यटक व भक्तांना सुलभ व व्यवस्थित होण्यासाठी संस्थान श्री देव गणपतीपुळे पंच कमिटी सुरक्षा रक्षक कर्मचारी पोलीस ग्रामस्थ यांनी विशेष मेहनत घेतली.