सारी यंत्रणा अद्याप अपयशी
प्रतिनिधी /बेळगाव
मागील 26 दिवसांपासून रेसकोर्स मैदानात दबा धरून बसलेल्या बिबटय़ाला पकडण्यात वनखात्याची सर्व यंत्रणा अपयशी ठरली आहे. ड्रोन कॅमेरे, प्रशिक्षित श्वान, हत्ती, जेसीबी, आधुनिक तंत्र, हनीट्रप ही सारी अंमलबजावणी अखेर व्यर्थ ठरली आहे. त्यामुळे गणेशोत्सव बिबटय़ाच्या धास्तीखालीच साजरा करावा लागणार, अशी चिंता लागली आहे.
जाधवनगर परिसरात एकावर हल्ला करून बिबटय़ाने रेसकोर्स परिसरात आसरा घेतला. तेव्हापासून वनखात्याची सारी यंत्रणा बिबटय़ाच्या मागावर आहे. बिबटय़ा गणेशोत्सव करूनच जाणार का? असे प्रश्नसंदेश सोशल मीडियावर फिरत होते. बिबटय़ा अद्याप मिळाला नसल्याने तो गणेशोत्सव करूनच जाणार, अशा चर्चा रंगू लागल्या आहेत.
रेसकोर्स परिसरात बिबटय़ाने आसरा घेतल्याचे अनेकवेळा स्पष्ट झाले आहे. तो नजरेलादेखील पडत आहे. मात्र त्यानंतर तो अदृश्य होत आहे. रेसकोर्स परिसरात 14 टॅप कॅमेरे व 6 पिंजरे लावण्यात आले आहेत. शिवाय दोन प्रशिक्षित हत्ती पथकदेखील तळ ठोकून आहेत. रेसकोर्सच्या दाट झाडींमध्ये अनेक ससे, रानमांजरे व भटक्या कुत्र्यांचा वावर आहे. बिबटय़ाला भक्ष्य म्हणून कुत्री प्रिय आहेत. त्यामुळे तो या ठिकाणीच वास्तव्य करून आहे, असे बोलले जात आहे. शिवाय रेसकोर्सच्या मैदानात ठिकठिकाणी पाणीसाठा आहे. त्यामुळे त्याला एकाच ठिकाणी भक्ष्य व पाणीदेखील उपलब्ध होत असल्याने तो इतके दिवस मुक्काम करून आहे, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. रेसकोर्स परिसरातील सर्व गोंधळ थांबवा व केवळ त्या ठिकाणी पिंजरे लावा, अशी मागणी वन्यप्रेमी अभ्यासकांतून होत आहे.
प्रशिक्षित पथकाकडून शोधमोहीम सुरू
बिबटय़ाच्या शोधासाठी प्रशिक्षित पथकाला पाचारण करण्यात आले आहे. पथकाच्या माध्यमातून शोधमोहीम सुरू केली आहे. हत्ती पथकही तळ ठोकून आहे. शिवाय इतर तांत्रिक गोष्टींचाही वापर केला जात आहे. त्यामुळे बिबटय़ा लवकर सापडेल.
-राकेश अर्जुनवाड (आरएफओ वनखाते)









