सातारा / प्रतिनिधी
प्राण्यांचे अवयव विक्री करण्यास शासनानेच बंदी घातलेली आहे. तरीही साताऱ्यात गेल्या दोन दिवसांपासून सातारा शहरात मोरांची पिसे विक्रीला आली असून ही पिसे परराज्यातून आणली गेलेली आहेत. त्याबाबत वनविभागास तरुण भारतने माहिती दिली असून वनविभागाचे उपवनसंरक्षक महादेव मोहिते यांनी यावर कार्यवाही करण्याच्या अनुषंगाने सुचना दिल्या आहेत, असे सांगितले. दरम्यान, एवढ्य़ा मोठया प्रमाणावर मोरांची पिसे विक्रीला कोठून आणली असा प्रश्न उपास्थित होवू लागला आहे.
अधिक वाचा- ४० हजार रुपयांच्या लाचेची मागणी करणाऱ्या तलाठ्यावर गुन्हा दाखल
गणपतीचा उत्सवजवळ आलेला असताना शहरात बाजारपेठेत मोरांची पिसे विक्री करणारी काही विक्रेते दिसू लागलेले आहेत. यांच्याकडे दोन प्रकारची पिसे असल्याचे समजते. छोटे आणि मोठे असे दोन प्रकार असून पिसे मोठया प्रमाणात विक्रीला आलेली आहेत. यामध्ये या पिसांबाबत ‘तरुण भारत’च्यावतीने चौकशी केली असता ती पिसे परराज्यातून पुणे येथे आणून साठा करण्यात आलेला आहे. तेथून काही लोक सातारा जिह्यात पिसे विक्रीला पाठवण्यात आलेली आहेत. दरम्यान, वनविभागाकडून अनेक कारवाया झालेल्या असताना या पिसांबाबत काहीच कार्यवाही का झाली नाही. याबाबत उपवनसंरक्षक महादेव मोहिते यांना ‘तरुण भारत’च्यावतीने फोटो पाठवून विचारणा करण्यात आली. त्याबाबत त्यांनी संबंधितांना सुचना देवून चौकशीसाठी आमचे पथक पाठवून देतो असे आश्वासन देण्यात आले. दरम्यान, या मोरांच्या पिसाबाबत उलटसुलट चर्चा सुरु असून नेमकी ही पिसे कशी आली?, मोरांची पिसे एवढय़ा मोठय़ा प्रमाणावर विक्रीला आल्याने त्यामध्ये मोरांची कत्तल नेमकी कुठे तरी झाली असावी अशी शक्यता व्यक्त होत आहे. दरम्यान, वनविभागाशी संपर्क साधला असता कृत्रिमरित्या मोरांची जी पिसे गळली जातात. त्या पिसांना विक्री करण्यास सवलत आहे. ही पिसे गळलेली आहेत का?, याची पाहणी केली जाईल, त्यानुसार आमच्याकडून कार्यवाही करण्यात येईल असे सांगण्यात आले.