पुणे / प्रतिनिधी :
Supriya sule : भाजीपाला ते औषधींपर्यंत केंद्र सरकारने महागाई करून ठेवली आहे. या महागाईमधून देशातील जनतेला बाहेर काढण्यासाठी केंद्र सरकारने विशेष प्रयत्न केले पाहिजे. मात्र, हे सरकार कोणतेही प्रयत्न करताना दिसत नाही. महागाईच्या विषयात केंद्र सरकार असंवेदनशील असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सोमवारी केली. रोहित पवार यांना कोणतीही काहीही नोटीस आलेली नाही. आमच्या कुटुंबातील कोणालाही नोटीस आली, तर आमची सहकार्याची भूमिका असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
केंद्र सरकारने पेट्रोल, डिझेल, सीएनजी, घरगुती गॅसच्या दरात केलेली वाढ आणि घरगुती वापराच्या वस्तूंवर लादलेला जीएसटीच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली भुसारी कॉलनी येथे जनआक्रोश आंदोलनास सुरुवात झाली. त्यावेळी त्या बोलत होत्या. सुळे म्हणाल्या, लोकसभेतदेखील महागाईच्या विषयावर आपण सातत्याने आवाज उठविला आहे. मोफत धान्य दिल्याचे सरकार सांगत आहे. धान्य दिल्याबद्दल सरकारचे आभार माना, अशी भाषा भाजपचे नेते वापरत आहेत. गरिबाला मदत केल्यानंतर त्याला आभार मानायला सांगणाऱया सरकारला किती मस्ती आहे, हेच यातून दिसते.
अधिक वाचा : MPSC च्या ऑप्टिंग आऊट कार्यपद्धतीत सुधारणा
महागाईच्या मुद्दय़ावर या सरकारला जागे करण्यासाठी अखेरपर्यंत आंदोलन करीत राहण्याचा आमचा निर्धार आहे. पेट्रोलवरील 5 रुपये कमी करून काही होणार नाही. केंद्र सरकार यंत्रणा आणि पैशाच्या जोरावर चुकीचे काम करीत आहे. ही दुर्दैवाची गोष्ट असून देशासाठी धोक्याची घंटा आहे. केवळ राजकीय व्यक्तींनाच यांनी नोटिसा पाठवल्या नाहीत, तर पत्रकारांनादेखील नोटिसा पाठवल्या आहेत. त्यामुळे देशाचे ऐक्य आणि संविधान धोक्यात आले आहे. केंद्र सरकारच्या कृतीतून हे स्पष्टपणे दिसत आहे, अशी टीकाही त्यांनी केली.
रोहित पवार संचालक राहिलेल्या ग्रीन एकर कंपनीची प्राथमिक चौकशी करण्याचे आदेश ईडीने दिल्याची माहिती समोर आली आहे. यावर बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, त्याची अजून चौकशी सुरू नाही. चौकशी करणार, अशी बातमी मी पाहिली आहे. त्यावर रोहित सोबत बोलणे झाले आहे. त्याला काही नोटीस आलेली नाही. आमच्या कुटुंबातील कोणालाही नोटीस आली, तर आमची सहकार्याची भूमिका राहिली आहे. माझा न्याय व्यवस्थेवर प्रचंड विश्वास आहे. त्यामुळे आम्हाला काही लपवयाची गरज नाही. त्यामुळे आम्हा कोणालाही नोटीस आलीच, तर कोणाला काही अडचण येणार नाही.