खरेदीसाठी लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद : बाजाराचा आज शेवटचा दिवस
वार्ताहर /माशेल
गणेश चतुर्थी सणानिमित्त भरणाऱया बाणस्तारी येथील प्रसिद्ध पारंपरिक माटोळी बाजाराला काल रविवारपासून सुरुवात झाली असून माटोळीचे पारंपरिक साहित्य व अन्य सामान खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी उडाली आहे. कोरोना महामारीच्या दोन वर्षाच्या ब्रेकनंतर प्रथमच हा चतुर्थी बाजार भरला झाला आहे.
सावईवेरे, बेतकी, प्रियोळ, केरी, कुंकळय़े, प्रियोळ या आसपासच्या भागातील बागायतदारांनी माटोळीसाठी लागणारे विविध प्रकारचे साहित्य बाजारात विक्रीसाठी आणले आहे. अन्य व्यापाऱयांनीही व्यापार थाटल्याने बाजार खचाखच भरलेला आहे. पहिल्या दिवशी पावसाने उसंत घेतल्याने ग्राहकांना मनसोक्त खरेदी करता आली.
व्यापारी व ग्राहकांची गैरसोय होऊ नये यासाठी भोम अडकोण पंचायतीचे सरपंच दामोदर नाईक यांनी स्वतः लक्ष घालून व्यापाऱयांना जागा आखून दिलेल्या आहेत. बाणस्तारीच्या या पारंपरिक बाजाराचे खास वैशिष्टय़ म्हणजे राज्यभरातील व्यापारी माटोळीसाठी लागणारे बागायती साहित्य घाऊक दरात खरेदीसाठी या ठिकाणी येतात. बागायती वस्तूंबरोबरच नववधूला चतुर्थीचे ‘वजें’ पाठविण्यासाठी लागणारे लाकडी साहित्य या बाजारात विक्रीसाठी उपलब्ध केले जाते. याशिवाय पारंपरिक मातीची भांडी व बांबूपासून तयार केलेले साहित्यही या चतुर्थीच्या बाजारात विक्रीसाठी आणले जाते. रविवार व सोमवार असे दोन दिवस हा बाजार भरविण्यात आला असून आज शेवटचा दिवस असेल.









