बिंबल खोतोडे येथे दरवषी 200 मूर्ती तयार करतात
उदय सावंत /वाळपई
बुधवारपासून गोमंतकातील सर्वांत मोठा उत्सव गणेश चतुर्थीचा सण मोठय़ा उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. यामुळे गणेश मूर्तीवर रंगकामांची अंतिम प्रक्रिया करण्याचे काम जोरात सुरू आहे. सत्तरीतील खोतेडा बिंबल येथील भावे कुटुंबीय गेल्या तीन पिढय़ांपासून गणेशमूर्ती बनविण्याची परंपरा जपलेली आहे. दरवषी सुमारे दोनशेहून अधिक गणेशमूर्ती वेगवेगळय़ा स्वरूपात साकारले जातात.
खोतोडा पंचायत क्षेत्रातील प्रतिष्ठित भावे कुटुंब आपला पंरपरागत शेती बागायती सांभाळून गणेशमूर्ती तयार करण्याचे काम गेल्या तीन पिढय़ांपासून करत आहे. या कुटुंबाची आर्थिक स्थिती सुदृढ असूनही या कुटुंबातील सदस्यांनी गणेशमूर्ती कला जपण्याचे आजही सुरूच ठेवले आहे.
याबाबत अधिक माहिती देताना या कुटुंबीयांच्या प्रतिनिधीने सांगितले की. तीन पिढय़ांपासून ही कला आपल्या कुटुंबाने जपलेली आहे. पूर्वी कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बेताचीच होती. यामुळे कदाचित आमच्या पूर्वजांनी गणेशमूर्ती चित्रशाळा सुरू करून आपला उदरनिर्वाह चालविण्यासाठी हा व्यवसाय सुरू केला असण्याची शक्यता आहे. मात्र आज तशी परिस्थिती नाही. आज आपल्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती सक्षम आहे. तरीही आज हा व्यवसाय सुरूच ठेवला आहे.
मूर्ती बनविण्याच्या खर्चाचा विचार करता त्यावेळी अगदी कमी दरात शाडू माती उपलब्ध होत होती. आज परिस्थिती वेगळी आहे. एक ट्रक माती आणण्यासाठी हजारो रुपये मोजावे लागतात. यामुळे हा व्यवसाय परवडत नाही. मात्र पंरपरागत व्यवसाय जपताना या कुटुंबाने श्री गणेशाची सेवा म्हणून हे व्रत सुरू ठेवलेले आहे. या चित्रशाळेत गेल्या काही वर्षांपासून सुमारे 200 पेक्षा जास्त मूर्ती तयार केल्या जातात, अशी माहिती भावे कुटुंबातील एका सदस्याने दिली.
सत्तरी तालुक्मयाबरोबरच इतर तालुक्मयात मूर्ती मोठय़ा प्रमाणात या कुटुंबीयांकडून करण्यात आलेल्या मूर्तींना विशेष मागणी असते. यामुळे हा व्यवसाय टाळता येत नाही. गेल्या तीन पिढय़ांपासून गणेश भक्तांशी निर्माण झालेले आपुलकीचे नाते सहजासहजी तोडता येत नाही. यामुळे ही परंपरा जपली जात आहे. असे भावे कुटुंबाने सांगितले.
सेवा म्हणून व्यवसाय जपला : भालचंद्र भावे
भावे कुटुंबातील अनेक सदस्य आज उच्चशिक्षित आहेत. मात्र पारंपरिक कलेच्या व्यवसायाकडे या कुटुंबाने दुर्लक्ष केलेले नाही. गणेशमूर्तीच्या चित्रशाळेच्या माध्यमातून या कुटुंबाला समाजामध्ये वेगळी प्रति÷ा प्राप्त झालेली आहे. ज्या ठिकाणी चित्रशाळा आहे. त्या शेजारी गणेशाचे मंदिर आहे. या मंदिरामुळे बिंबल गावाला आध्यात्मिक नावलौकिक प्राप्त झालेला आहे. श्री गणेशाची सेवा ही वेगवेगळय़ा माध्यमातून करता येते हे भावे कुटुंबीयांनी आतापर्यंत दाखवून दिल आहे. अशी प्रतिक्रिया कुटुंबातील एक प्रतिनिधी भालचंद्र भावे यांनी दिली.
सरकारने अनुदान योजना सुरू करावी!
सध्या महागाईचा फटका चित्रशाळेलाही बसत आहे. कारण रंगाच्या किमती वाढल्या असून मातीच्या किमती आकाशाला भिडत आहेत. अशा परिस्थितीत व्यवसाय म्हणून चित्रशाळा चालविणे कठीण बनले आहे. त्यामुळे सरकारने गणेशमूर्ती चित्रशाळांना अनुदान देण्याची योजना आखणे गरजेचे आहे, असे भावे कुटुंबीयांचे म्हणणे आहे.









