सुसाट धावणाऱया वाहनांमुळे स्थानिकांना त्रास : संतिबस्तवाड क्रॉसनजीक गतिरोधक बसविण्याची मागणी : प्रशासनाचे दुरुस्तीकडे दुर्लक्ष

वार्ताहर /किणये
पिरनवाडी ते किणयेपर्यंतचा रस्ता वाहतुकीसाठी धोकादायक बनला आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडलेले आहेत. यामुळे अपघातांच्या संख्येत वाढ होवू लागली आहे. या रस्त्यावरून सुसाट वेगाने वाहने जातात. यामुळे स्थानिक वाहनधारक व नागरिकांना जीव मुठीत घेऊनच ये-जा करावी लागत आहे.
बेळगाव-चोर्ला रोड पिरनवाडी ते किणये पर्यंतचा टप्पा हा अपघाती झोन बनला आहे. या रस्त्यावर सध्या वाहनधारकांची वर्दळ वाढली आहे. रस्त्याच्या देखभालीकडे सार्वजनिक बांधकाम खात्याचे दुर्लक्ष झाले असल्याच्या तक्रारी स्थानिक नागरिकांतून होत आहेत. गोव्याला ये-जा करण्यासाठी बेळगाव-चोर्ला रस्त्याचा अधिक उपयोग वाहनधारक करीत आहेत. खानापूर-लोंढामार्गे गोव्याला जाण्यापेक्षा हा चोर्ला रोड शॉर्टकट म्हणून वाहनधारकांची वर्दळ वाढली आहे. शनिवारी व रविवारी असे दोन दिवस तर वाहनधारकांची मोठय़ा प्रमाणात वर्दळ असते.
पाच-सहा वर्षात अनेक अपघात
गोव्याहून ये-जा करणारी वाहने सुसाट वेगाने धावतात. किणये ते पिरनवाडी पर्यंतच्या टप्प्यात गेल्या 5-6 वर्षात अनेकांचे अपघात होवून बळी गेलेले आहेत. जानेवाडी, नावगे, रणकुंडये, बहाद्दरवाडी, कर्ले, किणये या गावातील तरुण दुचाकींवरून येत असताना अपघात होवून ठार झालेले आहेत. गेल्या 5-6 वर्षांपासून हा रस्ता स्थानिक नागरिकांसाठी धोकादायक बनलेला आहे.
हुंचेनहट्टी क्रॉस, संतिबस्तवाड क्रॉस, रणकुंडये क्रॉस, बहाद्दरवाडी क्रॉस, किणये आदी ठिकाणी या रस्त्यावर यापूर्वी अपघाताच्या घटना घडलेल्या आहेत. संतिबस्तवाड व किणये येथील काही शेतकऱयांची जनावरेही अपघातामध्ये ठार झालेली आहेत. पिरनवाडी, हुंचेनहट्टी, बाळगनट्टी, बामणवाडी, संतिबस्तवाड, वाघवडे, नावगे, रणकुंडये, किणये, बहाद्दरवाडी, कर्ले, जानेवाडी, कावळेवाडी, बिजगर्णी, कुसमळी, उचवडे, बैलूर, जांबोटी आदी भागातील स्थानिक वाहनधारकांसाठी हा महत्त्वाचा रस्ता आहे. रोज बेळगावला ये-जा करण्याऱया वाहनधारकांची संख्याही मोठय़ा प्रमाणात आहे.
कित्येकवेळा सांगूनही दुर्लक्ष
पिरनवाडीपासून ते किणयेपर्यंतच्या रस्त्याच्या बाजूला गावे, शाळा, हॉस्पिटल, अंगणवाडी, विविध कार्यालये, बसस्थानक, दुकाने आहेत. त्यामुळे स्थानिक लोकांचा याच मुख्य रस्त्यावरून दैनंदिन व्यवहार, कामकाजानिमित्त ये-जा करावी लागते. मात्र, सदर रस्त्यावरून गोव्याला ये-जा करणारी वाहने मात्र बेफाम वेगाने जातात. यामुळे स्थानिक लोकांना मात्र धडकीच भरते. त्या वाहनधारकांना कित्येकवेळा सांगुनही याकडे कानाडोळा केला जात असल्याच्या तक्रारी नागरिक करीत आहेत.
या भागातील नागरिकांचा शेती हाच मुख्य व्यवसाय आहे. बेळगाव-चोर्ला रस्त्याच्या आजुबाजूलाच ग्रामस्थांची शेतशिवारे आहेत. त्यामुळे शेतकऱयांना रोज शेतासाठी याच रस्त्यावरून यावे लागते. मात्र समोरुन वाहने भरधाव येतात. त्यामुळे शेतकरी, जनावरे व महिलांना शेताकडे जाणेही मुश्किल बनलेले आहे, अशी माहिती शेतकऱयांनी दिली आहे.
गोव्याला जाणाऱया वाहनांबरोबरच या रस्त्यावर डंपर व टिप्पर या वाहनांची वाहतूकही अधिक होत आहेत. या टिप्पर चालकांचा वेग कधिही कमी प्रमाणात नसतो. यापूर्वी किणये गावाजवळ टिप्पर चालकांच्या अपघातात शाळकरी मुली व महिलांना अपघात होवून किरकोळ जखमी झाल्याचे प्रकार घडलेले आहेत. त्यामुळे या टिप्पर चालकांच्या वेगावर नियंत्रण आणण्याची गरज आहे. पिरनवाडी ते किणयेपर्यंतच्या या रस्त्याचे पॅचवर्क गेल्या एक-दोन महिन्यापूर्वीच करण्यात आले. मात्र पॅचवर्क करण्याचे केवळ सोंग करण्यात आल्याच्या तक्रारी होत आहेत.
गतिरोधक त्वरित बसवावेत

हा रस्ता वाहतुकीसाठी धोकादायक बनलेला आहे. बामणवाडी पूलाजवळ खड्डे पडलेले आहेत. या ठिकाणी अपघाताच्या घटना घडलेल्या आहेत. तसेच बेळगाव-चोर्ला रोडवरील संतिबस्तवाड गावाकडे जाणाऱया तसेच बाळगमट्टी गावाकडे जाणाऱया वळणावर गतिरोधक नसल्यामुळे या ठिकाणी अनेक अपघाताच्या घटना घडल्या आहेत. पीडब्ल्यूडी खात्याकडे गतिरोधक बसविण्यासाठी निवेदनही दिलेले आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱयांनी रस्त्याची पाहणी करून दुरुस्ती तसेच गतिरोधक बसविण्यासाठी प्रयत्न करावेत.
– बाळाराम शहापूरकर- बाळगमट्टी
भरधाव वाहनधारकांवर कारवाईची गरज

किणये गावच्या वेशीजवळ गेल्या महिनाभरापूर्वीच दोन अपघाताच्या घटना घडलेल्या आहेत. सुदैवाने यामध्ये जीवितहानी झाली नाही. यापूर्वी कित्येक अपघात झाले आहेत. रस्त्याच्या बाजूला शाळा, हायस्कूल, ग्रा.पं. कार्यालय आहेत. गावकऱयांना येथूनच ये-जा करावी लागते. मात्र गोव्याहून येणाऱया वाहनधारकांच्या वेगावर नियंत्रण नसते. अशा वाहनधारकांवर कारवाई करण्याची गरज आहे.
– अण्णु दळवी – किणये









