प्रतिनिधी, गडहिंग्लज
Kolhapur Crime News: गडहिंग्लज-चंदगड मार्गावरील महागाव येथील पाच रस्ता चौकात बनावट नोटांचे व्यवहार होणार असल्याची माहिती गडहिंग्लज पोलिसांना मिळताच छापा टाकून तिघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून 1 लाख 88 हजार 600 रुपयाच्या पाचशे, दोनशे आणि शंभर रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या. या प्रकरणी अब्दुलरजाक आब्बासाहेब मकानदार (वय 25, रा. मेहबुबनगर, चिकोडी), अनिकेत शंकर हुले (वय 20, रा. महागाव), संजय आनंदा वडर (वय 35, रा. शिक्षक कॉलनी नेसरी, मुळ गाव महागाव) या तिघांना अटक केली आहे.
गडहिंग्लजचे पोलिस निरिक्षक रविंद्र शेळके यांना महागाव गावच्या हद्दीत पाच रस्ता चौकात दोन इसम बनावट नोटा जवळ बाळगून त्या खपवण्याच्या इराद्याने येणार आहेत अशी बातमी मिळाली होती. त्यानुसार छापा टाकण्यासाठी उपनिरिक्षक विक्रम वडणे, हवालदार बाजीराव कांबळे, राजकुमार पाटील, नामदेव कोळी, दादू खोत, कॉन्स्टेबल दिपक किल्लेदार, गणेश मोरे हे सर्वजण तेथे पोहचले. शनिवारी दुपारी हे सर्वजन पाच रस्ता चौकात थांबले असता एक इसम मोटारसायकलवरुन येथे आला. त्यापुर्वीच आणखी दोघेजण त्याचे वाट पहात थांबले होते. या तिघांचाही संशय आल्याने त्यांना ताब्यात घेवून तपासणी केली असता त्यांच्याकडे बनावट नोटा आढळून आल्या.
दुपारी 1.15 वाजता ही कारवाई झाली. अब्दुलरजाककडे 65 हजार 500 रुपयाच्या पाचशेच्या बनावट नोटा आणि त्याच्याकडील मोटारसायकल जप्त केली आहे. अनिकेत कडील 67 हजाराच्या दोनशेच्या नोटा तर संजय वडर याच्याकडे 56 हजार 100 रुपयाच्या शंभराच्या बनावट नोटा आढळल्या आहेत. बनावट नोटांसह मोटरसायकल मिळून एकूण 2 लाख 28 हजार 600 रुपयाचा ऐवज जप्त केला आहे. या कारवाईची नोंद गडहिंग्लज पोलिसात करण्यात आली असून अधिक तपास पोलिस निरिक्षक रविंद्र शेळके करत आहेत.