सर्वत्र पाणीच पाणी ः गणेश मूर्तीकारांना फटका , अनेकांच्या घरात पाणी शिरल्याने तारांबळ
प्रतिनिधी/ बेळगाव
गेल्या पाच ते सहा दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने शनिवारी पुन्हा आपले रौदरुप दाखवून दिले. शहरासह उपनगर आणि ग्रामीण भागाला पावसाने अक्षरशः झोडपून काढले. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले. या पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले तर काहींच्या घरामध्ये पाणी शिरुन नुकसान झाले. गणेशचुतर्थी तोंडावर असल्यामुळे गणेशमूर्तीकार जोमाने कामाला लागले आहेत. या पावसाने धुवाधार सुरुवात केल्यामुळे गणेश मूर्तीकारांचीही तारांबळ उडाली. वडगाव येथील संभाजीनगरमधील गणपती मंदिर परिसरातील मूर्तीकारांच्या घरात पाणी शिरल्यामुळे मोठा फटका बसला आहे. गटारी भरल्यामुळे काहेंच्या घरात पाणी शिरले असून याला महापालिकाच जबाबदार असल्याने त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
शनिवारी झालेल्या पावसाने साऱयांचीच दाणादाण उडविली आहे. पावसाचा जोर वाढल्याने अनेक घरांमध्ये पाणी शिरुन साऱयांचीच तारांबळ उडाली आहे. या पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले. बघताबघता अनेक उपनगरांमध्ये गुडघाभर पाणी साचले. अनेकांच्या घरात पाणी शिरले. त्यामुळे महिला आणि लहान मुलांची तारांबळ उडाली होती. शहरातील ग्लोब थिएटर, गांधीनगर परिसरात पाणी साचून होते.
स्मार्टसिटीच्या कामांचा दर्जा उघडा पडला
गोवावेस सर्कल जवळील सिग्नलजवळच गुडघाभर पाणी साचून होते. त्यामधून वाहने चालविताना साऱयांचीच कसरत होत होती. या प्रकारामुळे स्मार्टसिटीच्या कामांचा दर्जा उघडा पडला आहे. स्मार्टसिटी अंतर्गत शहरातील कामे सुरू आहेत. मात्र या झालेल्या दमदार पावसामुळे अनेक ठिकाणी भर रस्त्यातच पाणी साचून आहे. गटारी तुंबून रस्त्यावरुन पाणी वाहत होते. त्यामुळे वाहन चालकांना आणि पादचाऱयांना मोठी कसरत करावी लागत होती. पावसाचा इतका जोर होता की त्यामधून छत्री घेवून चालणे देखील अवघड झाले होते. पाऊस कधी थांबतो, याचीच वाट अनेकांना पहावी लागत होती. मात्र पावसाची जोरदार संततधार सुरूच होती.
बाजारपेठेत फेरीवाले, विक्रेत्यांची तारांबळ
या पावसामुळे बाजारपेठेतील फेरीवाले, बैठे व्यापारी व इतर विक्रेत्यांची मात्र चांगलीच तारांबळ उडाली होती. गणेशोत्सव अवघ्या चार दिवसांवर येवून ठेपला आहे. त्यामुळे खरेदीसाठी ग्रामीण भागातील जनता आली होती. बाजारपेठेमध्ये मोठी गर्दीही उसळली होती. या गर्दीमुळे अनेक ठिकाणी वाहतुकीची कोंडी झाली होती. यातच हा जोरदार पाऊस आला आणि साऱयांचीच तारांबळ उडवून दिली.
वडगाव-संभाजीनगर परिसरात अनेक घरांत पाणी
संभाजीनगर-वडगाव परिसरातील गणपती मंदिरजवळ असलेल्या सचिन बांदिवडेकर यांच्या घरामध्ये पाणी शिरले. सचिन बांदिवडेकर हे गणेशमूर्ती तयार करुन विक्रीसाठी ठेवतात. सध्या त्यांची लगबग सुरू होती. त्यांनी सर्व गणेशमूर्ती तयार करुन ठेवल्या असताना अचानक त्यांच्या घरामध्ये पाणी शिरले. त्यामुळे तातडीने गणेशमूर्ती काढून त्यांना इतरत्र ठेवाव्या लागल्या. यामुळे तीव्र संताप व्यक्त केला आहे. यापूर्वी आम्ही गटारी स्वच्छ करा म्हणून मागणी केली होती. मात्र त्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे आम्हाला हा त्रास सहन करावा लागला आहे.
याच परिसरातील प्रसाद येळ्ळूरकर, अरुण लोहार, कार्तिक मंडगी यांच्या घरामध्येही पाणी शिरले. त्यामुळे त्यांनाही मोठा त्रास सहन करावा लागला. गटारीवरच अनेकांनी बांधकाम केल्यामुळे पाण्याचा निचरा होत नाही. गटारीमध्ये कचरा साचून आहे. त्या गटारी खुल्या करुन स्वच्छ करणे महत्वाचे आहे, असे त्यांनी सांगितले.
अनगोळ परिसरातही दमदार
अनगोळ परिसरात दमदार पाऊस कोसळला. त्यामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले. पाण्याचा निचरा होत नसल्यामुळे रस्त्यावरच गुडघाभर पाणी साचून राहिले होते. अनेकांच्या घरात देखील पाणी शिरले होते. सध्या गणेशोत्सवासाठी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी मंडप घातले आहे. त्या मंडपामध्येही गुडघाभर पाणी साचले होते. पाण्याला जाण्यासाठी वाट नसल्यामुळे ही समस्या निर्माण होवू लागली आहे. त्यामुळे महापालिकेने याकडे गांभीर्याने लक्ष देवून गटारी स्वच्छ कराव्यात आणि पाण्याला वाट मोकळी करुन द्यावी, अशी मागणी होत आहे.
नाथ पै सर्कल परिसरातही घरांमध्ये पाणी
नाथ पै सर्कल परिसरातील दिनकर पवार यांच्या घरात पाणी शिरले. याचबरोबर आणखी काही जणांच्या घरामध्ये पाणी शिरल्याने साऱयांचीच तारांबळ उडाली. पावसाला इतका जोर होता की बघता बघता सर्वत्र पाणीच पाणी झाले. काही जणांच्या घरामध्ये गळती देखील लागली होती. यामुळे अनेकांच्या घरात पाणी साचून होते. ते पाणी काढण्यासाठी महिला आणि लहान मुले धडपडताना दिसत होती.
बाजारपेठेवर परिणाम
गणेशोत्सव अवघ्या चार दिवसांवर येवून ठेपला आहे. त्यामुळे खरेदीसाठी साऱयांचीच धडपड सुरू झाली आहे. बाजारपेठेत गर्दीही उसळली होती. मात्र या पावसामुळे साऱयांनाच आडोसा घ्यावा लागला. व्यापारी वर्गाची तसेच ग्राहकांची चांगलीच तारांबळ उडाली होती. पाऊस आल्यामुळे त्याचा परिणाम बाजारपेठेवरही झाल्याचे दिसून आले.
आनंदनगर परिसरात घरात शिरले डेनेजचे पाणी
आनंदनगर परिसरात नेहमीच पावसामुळे घरांत पाणी शिरण्याच्या घटना घडतात. शनिवारी झालेल्या या दमदार पावसानंतर आनंदनगर, पहिला क्रॉस येथील काही जणांच्या घरामध्ये डेनेजचे पाणी शिरले होते. यामुळे त्या कुटुंबांना मोठा त्रास सहन करावा लागला. केशवनगर, अन्नपुर्णेश्वरीनगर, समृध्दीनगर परिसरातही सर्वत्र पाणीच पाणी झाले होते.
गांधीनगर परिसरातही पाणी साचून
गांधीनगर परिसरामध्ये झालेल्या पावसामुळे पाणी साचून होते. नेहमी प्रमाणे ब्रिजजवळ गुडघाभर पाणी साचले होते. त्यामुळे वाहन चालकांना कसरत करावी लागत होती. गटारीमधून पाणी रस्त्यावरुन वाहत होते. तसेच राष्ट्रीय महामार्गावरील पाणीही सर्व्हिस रस्त्यावर येत होते. त्यामुळे त्या ब्रिजजवळ मोठे पाणी तुंबले होते.
अनेक ठिकाणी वाहने अडकली
स्मार्टसिटीची कामे सुरू आहेत. मात्र ही कामे अत्यंत संथगतीने सुरू असल्यामुळ बहुसंख्य कामे अर्धवट स्थितीत आहेत. त्यामुळे त्या ठिकाणी अडकण्याचे प्रकार दिसून आले. खानापूर रोडवरील डीमार्ट शेजारी एक टॅम्पो अडकला होता. त्यामुळे त्या ठिकाणी वाहतुकीची कोंडी होत होती.