साडेतीन लाखाचे दागिने जप्त ः गोकाक पोलिसांची कारवाई
प्रतिनिधी/ बेळगाव
चोरीप्रकरणी एका तरुणाला अटक करून त्याच्याजवळून साडेतीन लाख रुपये किमतीचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. गोकाक पोलिसांनी ही कारवाई केली असून या प्रकरणातील आणखी एका संशयिताचा शोध घेण्यात येत आहे.
जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. संजीव पाटील यांनी ही माहिती दिली आहे. गोकाक येथील वेगवेगळय़ा वसाहतीत झालेल्या तीन घरफोडय़ांचा तपास लागला आहे. अटक करण्यात आलेल्या संशयितांकडून 44 ग्रॅम सोन्याचे दागिने, 1 किलो 100 ग्रॅम चांदी जप्त करण्यात आली आहे.
गोकाकचे पोलीस उपअधीक्षक मनोजकुमार नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गोपाल राठोड, उपनिरीक्षक एम. डी. घोरी व त्यांच्या सहकाऱयांनी ही कारवाई केली आहे. मार्च, जून व जुलैमध्ये झालेल्या तीन चोरी प्रकरणांचा उलगडा झाला असून पोलीस फरारी आरोपींचा शोध घेत आहेत.









