प्रतिनिधी / सातारा :
महाबळेश्वरमधील नाकिंदा येथे असलेले हॉटेल ब्राईट लॅण्डचे अनधिकृत बांधकाम झाले आहे. या बांधकामावर आणि ठेकेदारावर फौजदारी कारवाई करण्यात यावी, अशी सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी वाई प्रांताधिकाऱ्यांना दिली आहे. असे असताना त्याच हॉटेलमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उतरतात कसे?, मुक्काम करतात कसे, त्यांचे तर या हॉटेलच्या अनधिकृत बांधकामाला अभय नाही ना?, असा सवाल शिवसेनेचे जिल्हा प्रमुख सचिन मोहिते यांनी उपस्थित केला आहे.
सचिन मोहिते पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाण आहे. या ठिकाणी अनेक बांधकामे नियमबाह्य झालेली आहेत. तेथे जी बांधकामे चुकीच्या पद्धतीने झालेली आहेत. त्याबाबत तेथील सामाजिक कार्यकर्ते, शिवसेनेच्यावतीने वारंवार प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिलेली आहेत. प्रशासनाकडूनही त्या अनुषंगाने लिखीत स्वरुपात स्थानिक प्रशासनास कार्यवाही करण्याबाबतच्या लिखीत सुचना दिल्या आहेत. असे असताना महाबळेश्वर दौऱ्यावर आलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्याच हॉटेलमध्ये उतरले आहेत.
अधिक वाचा : महाराष्ट्रात खोके हराम संघटना, शिवसेनेची शिंदे गटावर जहरी टीका
ज्या हॉटेलचे बांधकाम बेकायदेशीरपणे नियमबाह्य केलेले आहे. ब्रिलियंट या हॉटेलवर कारवाई करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्त्यांनी केली होती. त्यानुसार तात्कालिन जिल्हाधिकाऱ्यांनी दि. 13 ऑगस्ट 2021 रोजी तात्कालिन प्रांताधिकाऱ्यांना दिले होते. त्या आदेशानुसार त्या सर्व्हे नंबर 3/4/ मिळकत हद्दीच्या पाठीमागील बाजूस स. नं. 2/10 देवस्थान इनाम वर्ग 3 चे जमीन मिळकतीवर प्रशस्त आर. सीसी इमारतीचे बांधकाम अनाधिकृत असल्याने ते पूर्ण करण्याच्या हेतूने मिळकतधारकांने बेकायेशीर बांधकाम सुरु ठेवल्याचे दिसून येत आहे. हे काम त्वरीत बंद करुन मिळकतधारक व बांधकाम ठेकेदारांवर फौजदारी कारवाई करावी, असा आदेश दिला होता. असे असताना मुख्यमंत्री नेमके तिथेच कसे थांबले. याचा अर्थ त्यांचे अशा अनाधिकृत बांधकाम करणाऱ्या हॉटेल्सवाल्यांना अभय आहे का?, असा सवाल मोहिते यांनी उपस्थित केला आहे.









