प्रतिनिधी / चिपळूण :
Ravindra Chavan’s instructions to the highway system : गणेशोत्सवासाठी कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांचा प्रवास सुखरूप होण्यासाठी मुंबई-गोवा महामार्गावरील रस्ते दुरुस्ती, खड्डे भरण्याची कामे युध्दपातळीवर करून उर्वरीत दोन दिवसांत शंभर टक्के काम पूर्ण करण्याचे निर्देश महामार्ग विभाग, कंत्राटदार कंपन्यांना दिल्याची माहिती राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिली. कशेडी बोगद्याची पाहणी करण्यात आली असून, एक लेन सुरू करण्याबाबत 30 ऑगस्ट रोजी अधिकारी सादरीकरण करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सार्वजानिक बांधकाम मंत्री चव्हाण यांनी शुक्रवारी रायगड जिल्ह्यातील पळस्पे येथून मुंबई-गोवा महामार्गाचा पाहणी दौरा स्थानिक लोकप्रतिनिधी, अधिकारी, कंत्राटदार यांच्यासमवेत सुरू केला. त्यांनी कशेडी येथून रत्नागिरी जिल्ह्यात प्रवेश केला. यावेळी त्यांनी कशेडी बोगद्यात जाऊन पाहणी केली. त्यानंतर येताना खेड, परशुराम घाटांची पाहणी करत येथील शासकीय विश्रामगृहावर अधिकाऱ्यांसमवेत महामार्ग कामांची आढावा बैठक घेतली. यावेळी आमदार भास्कर जाधव, शेखर निकम उपस्थित होते.
अधिक वाचा : सत्तेत असताना राष्ट्रवादीने आम्हाला काय दिले?; कार्यकर्त्यांचा जयंत पाटलांना सवाल
यानंतर पत्रकारांशी बोलताना बांधकाम मंत्री चव्हाण म्हणाले की, मी कोकणातीलच असल्याने येणारा गणेशोत्सव आणि चाकरमान्यांची वाढणारी वर्दळ या पार्श्वभूमीवर अधिवेशनात दिलेल्या माहितीनुसार महामार्गाचा पाहणी दौरा करत आहे. आपण दिलेल्या निर्देशानुसार महामार्गावरील खड्डे भरण्याचे काम सुरू झाल्याने पहिल्यासारखी परिस्थिती तितकीसी राहिलेली नाही. अजूनही दोन दिवस शिल्लक असल्याने या कालावधीत राहिलेले खड्डे पूर्णपणे भरावेत असे आदेश आपण यंत्रणेला दिलेले आहेत. काही ठिकाणी खड्डे युध्दपातळीवर बुजावण्याच्या दृष्टीने ‘रेडीमिक्स’ या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. हे तंत्रज्ञान कशापध्दतीने रस्त्यांमधील खड्डे बुजवते याचे प्रात्यक्षिक ही आपणाला दाखवण्यात आले आहे. त्यामुळे कोणत्याही पारिस्थितीत युद्धपातळीवर प्रयत्न करून गणेशोत्सवापूर्वी रस्त्याची संपूर्ण दुरुस्ती करुन रस्ता वाहतुकीसाठी सुसज्ज करण्याचे आदेश आपण विभाग व कंत्राटदारास दिले आहेत.
गणेशोत्सवासाठी येणाऱ्या चाकरमान्यास रस्त्यावरून प्रवास करताना त्रास होणार नाही याची दक्षता सर्व संबांधितांनी घ्यावी आाणि रस्ता दुरुस्ती, रस्ता जोडणे, पेव्हर ब्लॉक टाकणे आदी संबांधित कामे तातडीने संपवावीत, असेही सांगितले आहे. महामार्गावरील काँक्रटीकरणाचे काम सध्या युध्दपातळीवर सुरु आहे, परंतु यासंदर्भात काही प्रकरणे कोर्टात असल्यामुळे कामाच्या प्रगतीमध्ये अडचण निर्माण होत आहे. तरीही येत्या डिसेंबरअखेरपर्यंत या मार्गातील सर्व अडचणी दूर करुन संपूर्ण मुंबई-गोवा महामार्ग काँक्रीटीकरण पूर्ण होईल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.









